आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑनलाइन’ पद्धतीमुळेच अडले शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचेही ‘घोडे’, हेलपाट्यांनी विद्यार्थी त्रस्‍त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात ‘ऑनलाइन’ खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, सेतू केंद्र किंवा सायबर कॅफेही त्यांना मदत करण्यास अयशस्वी ठरले आहेत. 
 
सध्या बहुतेक सेतू आणि सायबर कॅफेची ऑनलाइन यंत्रणा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरण्यात व्यग्र आहे. नेमक्या याच कालखंडात शिष्यवृत्तीच्या अर्जांची मागणी झाल्याने विद्यार्थ्यांच्या त्रासाची तीव्रता अधिक वाढली आहे. बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील अाहेत. त्यामुळे एकाच वेळी आई-वडील (कर्जमाफीच्या अर्जासाठी दोघेही आवश्यक असल्याने) आणि मुलांना या केंद्रांवर जावे लागत आहेत. 
 
शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यात सर्वात मोठी अडचण मोबाइल नंबर आधार क्रमांकाच्या ‘लिंकिंग’ची येत आहे. ही अट यापूर्वी नव्हती. त्यामुळे कोणत्याही ऑनलाइन यंत्रणेचा आधार घेऊन विद्यार्थी त्यांचा अर्ज दाखल करू शकत होते. या वेळी सर्व्हर पोर्टल बदलल्याने शासनाने ही नवी अट लागू केल्याचे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे. विशेष असे की मोबाइल नंबर आणि आधार क्रमांकाच्या लिंकिंगनंतरच विद्यार्थ्यांचे ‘लॉगिन’ उघडले जात असून, संबंधितांना अर्ज भरणे शक्य होत आहे. त्यातही तो पूर्वीप्रमाणे बार्टीच्या ‘महाईस्कॉल’ या संकेतस्थळावर भरता येत नाही. त्याऐवजी या वर्षी ‘महाडीबीटी’हे नवे संकेतस्थळ जारी करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना याचीही माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. 
 
यात आणखी भर म्हणून सिमकार्ड देणाऱ्या सर्वच मोबाइल ऑपरेटर कंपन्यांना शासनाने ‘आयडी व्हेरिफिकेशन’ अनिवार्य केले आहे. परिणामी, बीएसएनएल, वोडाफोन, आयडियापासून ते टेलिनॉर, जीओपर्यंत सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना बोलावून त्यांचा आधार क्रमांक बोटांचे ठसे नोंदवित आहे. विशिष्ट डिव्हाइस वापरून केल्या जाणाऱ्या या कृतीमुळे आपसूकच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडला जातो, असा विद्यार्थ्यांचा समज आहे. परंतु, वास्तविकता तशी नाही. सदर कंपन्या या केवळ शासनादेशाचा आदर म्हणून ग्राहकाचा आधार क्रमांक बोटांचे ठसे जोडत आहे. हे लिंकिंग शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना उपयोगी पडत नाही. त्यासाठी सेतूवर जाऊन आधारच्या अधिकृत संकेतस्थळावरच (यूआयडीएआय) मोबाइल क्रमांक जोडावा लागतो. 
 
या गुंतागुंतीमुळे अनेकांना दररोज मोबाइल आॅपरेटर कंपनीचे कार्यालय, सेतू केंद्र आणि सायबर कॅफे येथे घिरट्या घालाव्या लागत अाहे. परंतु, एवढी पायपीट करूनही त्यांच्या हाती यश लागत नाही. परिणामी, महाविद्यालयांनी दिलेली डेडलाइन पाळणे अगदीच अशक्य आहे. त्यासाठी मुदतवाढ दिली जावी आणि त्यासंबंधीच्या तारखा थेट समाजकल्याण खात्याने जाहीर कराव्या, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
 
अशीच परिस्थिती हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आठवी- नववीतील अनुसुचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची झाली आहे. यावर्षीपासून ऑनलाइन शिष्यवृत्ती फॉर्म भरावे लागत असल्यामुळे या छोट्या विद्यार्थ्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कधी वेबसाइट ओपन होत नाही. तर कधी सव्हर डाऊन असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. 
 
महाविद्यालयांनी दिली १५ ची डेडलाइन : बहुतेकमहाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर ही डेडलाइन दिली आहे. हीच तारीख कर्जमाफीच्या अर्जांचीही आहे. दोन्ही कामे एकाच वेळी आल्याने या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज दाखल करणे, शक्य नाही. दुसरीकडे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, ही जबाबदारी प्राचार्यांची असल्याने वेळेच्या आत अर्ज भरवून घेणे गरजेचे आहे, असे काही प्राचार्यांचे म्हणणे आहे. 
 
तोडगा निघेलच, अर्ज भरणे सुरू 
शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या स्तरावर सुरू आहे. त्यात अडचणी येतात, हे खरे आहे. परंतु, कुणीही लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर काही डेडलाइन दिली असेल तर त्याबाबत खात्री देता येणार नाही. 
- अमोल यावलीकर, सहायक समाजकल्याण आयुक्त, अकोला. 
 
लिंकिंगला हवे कमाल ९० दिवस 
मोबाइल-आधार जोडणीची पद्धत शासनाने या वर्षीपासूनच लागू केल्याने यापूर्वी कुणीही लिंकिंग केलेले नाही. त्यामुळे सर्वांनाच आधी आधार लिंकिंगचा सामना करावा लागत आहे. या प्रक्रियेतही सर्वच यशस्वी होतात, असे नाही. आणि ज्यांना यश मिळाले त्यांचे लिंकिंग अपडेट व्हायला १५ ते ९० दिवस लागतात, असे सेतू संचालकांकडून सांगण्यात येत आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...