आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डिजिटल’ सर्टिफिकेटच्या कचाट्यात अडकली पेन्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘डिजिटल लाईफ सर्टीफिकेटची’अनिवार्यता केल्याने तब्बल २० हजाराहून अधिक वृद्धांची इपीएफच्या (भविष्य निर्वाह निधी) आधारे मिळणारी पेन्शन अडकली आहे. ही पेन्शन केवळ चालू महिन्याची नव्हे तर गेल्या तीन महिन्यांपासून थांबली आहे. 
 
उतरत्या वयात एकमेव आर्थिक आधार असलेला हा स्रोत अशाप्रकारे थांबल्याने ज्येष्ठ नागरिकांना औषधी आणि खाण्या-पिण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक इपीएफओ कार्यालयात असे ४८ हजार पेन्शन धारक आहेत. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांकडे अद्यापही डिजीटल लाईफ सर्टीफिकेट नाही. परिणामी मे २०१७ पासूनची त्यांची पेन्शन अडकली आहे. 
 
मे महिन्याची पेन्शन जून महिन्यात खात्यात जमा होते, त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या महिन्यात बँकांत चकरा घातल्या. त्यावेळी त्यांना पेन्शन जमाच झाल्याचे वास्तव कळले. याबाबत विचारणा केली तेव्हा काहीही मदत करता बँकांनी थेट पीएफ ऑफीसशीच संपर्क करा, असा अनाहूत सल्ला दिला. दरम्यान पीएफ कार्यालयात पोहोचल्यानंतर ही सोय बँकांनाच करायला सांगितली आहे, असे सांगून त्यांना टोलवले गेले. 

दोन्ही ठिकाणी होत असलेली ही अडवणूक असह्य झाल्याने काही युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांनी इपीएफओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर सिव्हील लाईन्स स्थित या कार्यालयात तीन काऊंटर उघडले गेले. परंतु कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव आणि कनेक्टिव्हीमध्ये वारंवार उद्भवणारे अडथळे यामुळे त्याचाही फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे अजूनही २० हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक पेन्शनपासून वंचित आहेत. 

या ज्येष्ठ नागरिकांना मे महिन्यांपासूनची पेन्शन मिळाली नाही. दरम्यान येत्या २२ तारखेपर्यंत ज्यांचे डिजीटल लाईफ सर्टिफिकेट तयार होतील, त्यांचीच पेन्शन पुढील महिन्यात बँक खात्यात जमा होणार आहे. इतरांना त्यापुढच्या महिन्याची वाट पहावी लागेल. सर्टिफिकेट पासून दूर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची एकूण संख्या आणि डिजीटल सर्टिफिकेटसाठी उपलब्ध असलेली तोकडी सोय पाहू जाता मशीन्सची संख्या वाढवणे त्यामुळेच गरजेचे आहे. 
१८ला दुपारी बँक अधिकाऱ्यांची सभा :डिजीटल लाईफ सर्टिफिकेटचा गुंता सोडवण्यासाठी इपीएफओच्या स्थानिक क्षेत्रीय कार्यालयात मंग‌ळवार, १८ जुलैला दुपारी वाजता बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्या बँकेतून पेन्शन मिळते, संबंधित पेन्शन धारकाला त्याच ठिकाणी डिजीटल लाईफ सर्टिफिकेट मिळेल, अशी खात्री या बैठकीतून प्राप्त केली जाईल. दरम्यान एसबीआय आणि पीएनबीच्या काही शाखांसह अमरावतीच्या इपीएफ कार्यालयात ही सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याचे इपीएफओचे म्हणणे आहे. 

काय आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ? 
डिजीटल सर्टिफिकेट म्हणजे संबंधितांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगची नोंद करणे. पूर्वी हयातीचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) कागदावरच लिहून घेतला जायचा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बँकेतर्फेच ही सोय उपलब्ध करून दिली जायची. परंतु या वर्षीपासून शासनाने पेन्शनरची डिजिटल ओळख नोंदवून ठेवण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच संबंधितांना प्रत्यक्ष कार्यालयात येऊन आपापल्या अवयवांची नोंद करुन घ्यावी लागत आहे. 

अजब कात्रीमुळे ससेहोलपट 
निरनिराळ्या आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ‘इपीएफ’च्या आधारे पेन्शन दिली जाते. शासनाने या वर्षीपासून त्या सर्वांना ‘डिजीटल लाईफ सर्टीफिकेट’ लागू केले आहे. मुळात ही प्रक्रिया मार्च २०१७ पूर्वीच पूर्ण करावयाची होती. परंतु मशीन्सची उपलब्धता नाही म्हणून बँकांनी हात वर केले तर आमच्यातर्फे त्यांना (बँकांना) कमिशन दिले जाते, म्हणून आम्ही कशाला ती व्यवस्था करायची, अशी इपीएफओची भूमिका आहे. या अजब कात्रीमुळे ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...