आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशिक्षित "दादा’ची जिद्द; अाेस पडलेली शाळा फुलवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागासलेल्या भागात राहणारा ताे स्वत: अशिक्षित अन् त्या एरीयाचा ‘दादा.’ या ‘दादा’ला राजकारणातील प्रवेशानं त्या एरीयातील लाेकांनी ‘भाऊ’ केलं. समाजकारणात सक्रिय झाल्यावर त्याला शिक्षणाचं महत्त्व कळालं. या जाणीवेतूनच त्यानं घेतला परिसरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ध्यास. या ध्यासाच्या पूर्ततेसाठी सुरू झाला संघर्ष. या प्रदीर्घ संघर्षातूनच एकेकाळी अाेस पडलेली शाळा अाता मुलांच्या किलबिलाटांनं पुन्हा अाद्याक्षरं गिरवू लागली. शेकडाे मुलं ‘वाघिणीचं दूध’ पिऊन पुन्हा गुरगुरू लागली. अकाेल्यात मागास भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे ‘वाघिणीचं दूध’ नेण्याचं काम करताेय दिलीप देशमुख नावाचा संवेदनशील माणूस.
अकोल्याच्या जुने शहर भागात ३० ते ३५ वर्षांपूर्वी मजूर, कामगारांसाठी शेकडो एकर जागेत शिवसेना झोपडपट्टी वसवण्यात आली. या झाेपडपट्टीत सगळीच हातावरचं जगणं जगणारी माणसं. कष्टाची भाकरी खाणारा इथला बहुतांश मजूर व्यसनाच्या जाळ्यात अडकलेला. त्यात पाेरगा ‘शिकून कुठं मास्तर हाेणार हाये?’ ही भावना असलेल्या पालकांमुळं महापालिकेची चाैथीपर्यंतची शाळाही अाेस पडायला सुरुवात झालेली. याच भागात राहणारा एक ख्यातनाम तरुण म्हणजे दिलीप देशमुख. परिसरातील किरकाेळ भांडणांशी भिडत केसेस अंगावर घेत ताे त्या भागाचा ‘दादा’ झाला. शिक्षणाचा गंधही नसलेल्या या दादाला परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून अाणलं. राजकारणानं या युवकाचं जगणं बदललं. समाजातील प्रश्नांशी भिडताना त्याच्यातील संवेदनशील माणूस समाेर अाला. कर्माशी इमान राखणाऱ्या या माणसानं शहरात अापल्यासाठी प्रत्येकाच्या मनात अादराचं स्थानं मिळवलं. अशी स्वत:ची राजकीय प्रगती साधत असताना देशमुख यांच्या मनात रुखरुख हाेती, ती अापण अशिक्षित असल्याची. महापालिकेत काम करत असताना शिक्षणाअभावी अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. एवढेच नव्हे, तर दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतरही केवळ शिक्षणाअभावी मोठे पदही त्यांना मिळू शकले नाही. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घेतला ध्यास. आपण शिकलो नाही, पण आपल्या भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांची दुनिया बदलण्याचा.

असे आणले विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात : दररोजशाळेच्या प्रार्थनेला हजर राहून आपल्या भागातील नेमके कोणते विद्यार्थी आज शाळेत आले नाहीत, याची दिलीप देशमुख जातीने नोंद घेत असत. ज्या-ज्या पालकांच्या मुलांनी शाळेला दांडी मारली. त्यांच्या घरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून, त्यांना मुलांना शाळेत जाण्यास परावृत्त करीत, असे अनेक वर्षे केल्यानेच मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण झाली. ही ओढ कायम ठेवण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले. संगणक संचासह वाचनालय, उद्यानही तयार केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी स्वत:सह शाळेतील शिक्षकाच्या मदतीने केजी-१ वर्ग सुरू केला. महापालिकेत केजी-१ मधील शिक्षकांच्या वेतनाची सोय नसल्याने वर्गणी करून या शिक्षकांना मानधनही दिले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांच्या भागाला लागून असलेल्या दोन खासगी शाळा बंद पडल्या.

सुविधांकडेही दिले लक्ष : आजमहापालिका शाळांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. ही बाब लक्षात घेऊन दिलीप देशमुख यांनी प्रशासनाशी वेळप्रसंगी वाद घालून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेली ही शाळा आठव्या वर्गापर्यंत येऊन थांबली नाही, तर आज दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेली एकमेव शाळा ठरली आहे.

ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न
^हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता आले. यात शिक्षकांचाही मोठा वाटा आहे. शाळेचे विद्यार्थी एसआरपी, पोलिस विभागासह शासकीय नोकरीत आहेत. परंतु, माझे ध्येय अद्यापही पूर्ण झालेे नाही. अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरूच आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.'' दिलीप देशमुख, नगरसेवक.