आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठच्या २२ गावांत आपत्ती समिती स्थापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - नद्यापुरामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता तालुक्यातील नदीकाठच्या २२ गावांत तीन महिन्यांचे धान्य केरोसीन एकाच वेळी वाटप करण्याचे, पावसाळ्याच्या दरम्यान प्रसूत होण्याची शक्यता असणाऱ्या गरोदर महिलांना गाव सोडून नातेवाइकांकडे जाण्याच्या संबंधित गावात पूरपरिस्थितीदरम्यान आवश्यक तो औषधीसाठा पोहोचवण्याच्या सूचना प्रभारी तहसीलदार भारत किटे यांनी दिल्या आहेत. संबंधित गावात ग्राम आपत्ती समिती स्थापन केली असून, तालुक्याच्या ठिकाणी पूरनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत तालुक्यातील गौतमा, आस, विद्रूपा, जमुना, नागझरी, वान, पूर्णा पठार या नद्यांच्या पुरामुळे आडसूळ, उमरी, वांगरगाव, नेर, सांगवी, पिवंदळ खुर्द, दानापूर, सौंदळा, वारखेड, उबारखेड, खेलदेशपांडे, अडगाव, मनात्री, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, डवला, नरसीपूर, खेळसटवाजी, तेल्हारा, पिवंदळ बुद्रूक, बाभुळगाव आदी गावांना धोका निर्माण होतो. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. गावांना वेढा पडून चोहोबाजूने पाणी असल्याने अनेक नागरिकांचा संपर्क तुटतो. नदीचे पाणी कमी होईपर्यंत जीवनावश्यक वस्तू, औषधी उपचार याचा अभाव गावात राहतो. गंभीर आजारी रुग्ण, गरोदर महिला यांना वेळप्रसंगी खाटेवर बसवून न्यावे लागते. काही गावांमधील संपर्क तुटून जातो. त्यामुळे गावकऱ्यांसोबत संपर्क होऊ शकत नाही. काही गावांमध्ये दाेन पेक्षा जास्त नद्यांचा संगम होतो, त्या गावांना पुराचा जास्त धोका संभवतो. पुर आल्यानंतर होणारी धावपळ थांबावी, लोकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पुरनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गावातील लोकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. समितीमार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व बाबी लक्षात घेता शासनाकडून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पूरनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष, तर गटविकास अधिकारी हे सचिव आहेत. नगरपालिका मुख्याधिकारी, ठाणेदार तेल्हारा, हिवरखेड, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, अकोट, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी, तेल्हारा, सहायक अभियंता, वान प्रकल्प, उपविभाग क्रमांक यांना सदस्यपदी नेमण्यात आले आहे. पुराचा वेढा पडणाऱ्या गावातील पावसाळ्याच्या काळात प्रसूत होण्याची शक्यता असणाऱ्या गरोदर महिलांना त्यांच्या गावात राहता इतरत्र नातेवाइकांकडे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बचाव साहित्य झाले प्राप्त
पूरपरिस्थितीमध्येआपत्ती व्यवस्थापन शोध बचाव साहित्य तहसील कार्यालयास प्राप्त झाले असून, यामध्ये लाइफ जॅकेट १५, इन्पेटेबल लाइफ जॅकेट १०, मेडिकल किट १, सर्च लाइट यांचा समावेश असल्याचे तहसीलदार भारत किटे यांनी सांगितले.

विभागांना देण्यात आल्या सूचना
संबंधित गावांमध्ये रास्त भाव दुकानातून वितरित होत असलेले धान्य केरोसीन शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे वाटप एकासोबत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गावामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान आवश्यक तो औषधीसाठा पोहोचवण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले आहेत.

ग्राम समितीमध्ये यांचाही राहील समावेश
पुराचा धोका असणाऱ्या २२ गावांमध्ये ग्राम आपत्ती समितीची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, कोतवाल गावातील पट्टीचे पोहणारे पाच नागरिक यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...