आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो लीटर पाण्याचा दोन महिन्यांपासून अपव्यय सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. पाणी हेच जीवन आहे, हे या आशयाचे संदेश विविध सेलिब्रिटीजच्या माध्यमातून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या राज्य शासनाचीच एक भाग असणारी यंत्रणा गत दोन महिन्यांपासून लाखो लीटर्स पाण्याच्या अपव्ययाकडे डोळेझाक करत आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे पाणी साचतेय, त्या शेतकऱ्याने दोन महिन्यांत तीन वेळा लेखी अर्ज, विनंत्या केल्या, डझनवार तोंडी विनंत्याही केल्या. मात्र, जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा योजना या दोन्ही यंत्रणांनी जलवाहिनीचे लिकेजेस अद्यापही दुरुस्त केले नाहीत.
अकोट-अकोला मार्गावरील बळेगावनजीक बजरंग हरिप्रसाद झुनझुनवाला यांचे शेत आहे. या शेताजवळून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतील गावांना पाणीपुरवठा पुरवणारी जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली आहे. या तिन्ही लिकेजेसमधून झुनझुनवाला यांच्या शेतात दररोज हजाराे लीटर पाणी साचत आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, शेतीचे काम करता यावे, यासाठी बजरंग झुनझुनवाला यांनी फेब्रुवारी २०१६, १९ फेब्रुवारी २०१६ २२ फेब्रुवारी २०१६ या तारखांना लेखी अर्ज दिलेत. जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात अनेक चकरा मारल्यात. मात्र, एप्रिल महिना आल्यावरही अद्याप ही गळकी जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली नाही.

खरिपाचीतयारी करण्यात अडचण : वऱ्हाडातीलशेतकरी होळीनंतर खरिपाच्या तयारीला लागतात. शेताला नांगरून ठेवतात. शेतामधील फण काट्या उचलतात. बांधावरील काट्या तोडतात. नंतर चैत्र वैशाखाच्या कडक उन्हाळ्यात शेत वाळल्यानंतर योग्य पाऊस झाल्यावर पेरणी करतात. मात्र, लिकेजमधून पाण्याची गळती होत असल्याने बजरंग झुनझुनवाला यांचे शेत आेलेच आहे. आता खरिपाची तयारी कशी करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. गत दोन महिन्यांपासून लाखो लीटर्स पाण्याच्या अपव्यय होत असल्यावरही संबंधित यंत्रणेने कारवाई केल्यामुळे पाणीटंचाईचे विभागाला गांभिर्य नसल्याचे दिसून येते. ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे पाणी साचतेय, त्या शेतकऱ्याने अनेकदा तक्रारी, मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

शासनाने न्याय द्यावा
^गळत्या जलवाहिनीचे लिकेजेस दुरुस्त करण्याची मागणी मी संबंधित विभागाकडे वारंवार केली आहे. लेखी अर्ज देऊनही समस्या सोडवण्यात आली नाही. त्यासाठी मी कार्यालयाचा अनेकदा उंबरठा झिजवला. मात्र, अधिकारी दखल घ्यायला तयारच नाहीत. शासनाने मला न्याय द्यावा. मला खरिपासाठी शेत तयार करायचे आहे. तरी लिकेजेस दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा'' बजरंग झुनझुनवाला, शेतकरी

पाणीपट्टी थकित
^ग्रामीणपाणी पुरवठा योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींकडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेकडे ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे विभागाकडे निधीची कमतरता आहे. तरीही याबाबचे प्रकरण वरिष्ठांना कळवले आहे.'' हरिदास ताठे, उपविभागीयअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अकोट

अपव्यय टाळावा
^खारपाणपट्ट्यामध्ये पाणीटंचाईभासण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात देखील इतरत्र पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. त्या तुलनेत अकोट तालुक्यात पाणीटंचाईच नाही. वान धरणात भरपूर पाणीसाठा आहे. मात्र, त्याची नासधूस करण्याचा अधिकार कोणालाच नाही. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. '' ब्रह्मकुमार पांडे, तालुकाध्यक्ष,छावा संघटना, अकोट तालुका