आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील अन्नसुरक्षा धोक्यात, लाखो रुपयांचे धान्य वाऱ्यावर,पुरवठा विभागाची सुरक्षा यंत्रणा ठरतेय कुचकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेअभावी जिल्ह्यात अन्नसुरक्षा धोक्यात असल्याचे वास्तव आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या सात गोदामांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. गोदामे खुराडे बनली असून, लाखो रुपयांच्या मालाची सुरक्षा करण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
१४ एप्रिल रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गोदामाला आग लागून शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या ज्वारीची हानी झाली. पुरवठा विभागाची यंत्रणा आग कोणत्या कारणाने लागली याचा पत्तासुद्धा अद्याप लावू शकलेली नाही. शासकीय गोदामांच्या स्थितीचा आढावा घेतला असता पुरवठा विभागाच्या नियंत्रणात असलेल्या सात गोदामांपैकी दोन गोदामे वगळता इतर ठिकाणी सुरक्षा रक्षकसुद्धा कार्यरत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. शनिवार, २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेरफटका मारला असता आग लागलेल्या गोदामाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून आली. एकीकडे प्रत्येक अधिकाऱ्यासाठी जिल्हा प्रशासन एसी कॅबिन बनवण्याचा आग्रह धरते. पण, प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी लाखो रुपयांचे धान्य साठवले जाते, ती जागा मात्र रामभरोसे आढळून आली. गोदामाला सुरक्षा तर सोडा, पण साधी आवारभिंतसुद्धा बांधण्यात आली नाही. गोदामाच्या छतावरील टिनपत्राचीसुद्धा जाळी झाली असून, भिंती उंदीर, घुशींनी पोखरल्या आहेत. खिडक्यांतून आत डोकावून पाहिले असता आत किती धान्य आहे ते कसे बाहेर काढायचे याचा अंदाज चोरट्यांना सहज येऊन जातो. अशाप्रकारची परिस्थिती गोदामाची असल्यानंतरसुद्धा या ठिकाणी एकाही सुरक्षा रक्षकाची ड्यूटी लावण्याचा विसर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गोदामांमध्ये सुरक्षा रक्षक असायला हवेत. परंतु, पदेच रिक्त असल्याने गोदामात रात्री सुरक्षा रक्षक कार्यरत नसतात. दिवसभर गोदामातील कामगारांच्या भरवशावर सुरक्षा होत असली, तरी रात्री मात्र चोरट्यांना रानच मोकळे असते. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवशावर गोदामातील धान्याची सुरक्षा केली जात असली, तरी हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याचे आगीच्या घटनेवरून समोर आले.

सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी : सरकारीगोदामातील धान्याच्या रक्षणासाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र, लाखो रुपयांच्या मालाच्या सुरक्षेसाठी दहा हजार रुपये महिन्याच्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याचा विसर जिल्हा प्रशासनाला पडला आहे. पदे रिक्त असतील तर तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षकाची नेमणूक प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे.

पावसाळ्यापूर्वीतरी दुरुस्ती करावी : दोनमहिन्यांनंतर पावसाळा सुरू होईल. किमान त्यापूर्वी तरी गोदामाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नाही तर नेहमीप्रमाणे धान्य खराब झाल्याची बतावणी करून गरिबांना धान्य वेळेत पुरवण्यात दिरंगाई केली जाईल, यात शंका नाही.

घटनेचानाही लागत तपास : गोदामातूनधान्याचे कट्टे चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. मात्र, बदनामीपोटी तक्रारीसाठीसुद्धा गोदाम व्यवस्थापक पुढे येत नसल्याची खंत आहे. एखादी तक्रार झाली तर चोरट्यांना पकडण्यात आणि हे कट्टे जप्त करण्यात पोलिसांना कधीही यश हाती लागत नाही.

आम्ही लक्ष ठेवतो
^दिवसा कर्मचारीतर रात्रीच्या वेळी आम्हीच लक्ष ठेवतो. गोदामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असावेत, पण पदेच रिक्त असल्याने आम्ही काय करणार.'' आनंद गुप्ता, गोदामव्यवस्थापक
सुरक्षा रक्षकांचे पद रिक्त

^जिल्ह्यातदोनठिकाणी वगळता इतर गोदामांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत नाहीत. आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर इक्स्टिंग्विशर लावण्यात आले आहेत.'' अनिल टाकसाळे, जिल्हापुरवठा अधिकारी

धान्याचा नाही कुणी वाली
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर खदान भागातील धान्य गोदामात चार हजार क्विंटल धान्य ठेवले जाईल एवढी क्षमता आहे. मात्र, येथे एकही कर्मचारी २४ तास तैनात ठेवला जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत.