आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग क्रमांक २५ मध्ये कचरा संकलनासाठी आता आरोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरकचरामुक्त करायचे असेल, तर त्याची सुरुवात प्रभागापासून करावी लागेल. प्रत्येक प्रभागात कचरा संकलन झाले, तर रस्त्यावर कचरा येणार नाही आणि प्रभाग पर्यायाने शहर स्वच्छ राहील. या हेतूनेच प्रभाग क्रमांक २५ मधील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन चक्क ‘कचरा आहे का कचरा’, अशी आरोळी कचरा संकलनासाठी आलेला सफाई कर्मचारी मारून नागरिकांना संकलित केलेला कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन तर दुसऱ्या बाजूने जनजागरण करीत आहे. या अभिनव पद्धतीला प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. अनेक नागरिक दिवसभर घरात निर्माण झालेला सर्व प्रकारचा कचरा डस्टबीनमध्ये संकलित करतात आणि सफाई कामगाराने आणलेल्या गाडीत टाकतात.

कचरामुक्तीसाठी सर्वच ठिकाणी वेगवेगळे उपाय आखले जात आहेत. परंतु, या सर्व उपायांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. जोपर्यंत लोकसहभाग मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही उपाययोजना यशस्वी होत नाहीत. यापूर्वी प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले. ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीसाठी हॉटेल, रेस्टॉरन्ट व्यावसायिकांमध्ये जनजागृती केली. यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली. याच बरोबर आता नगरसेवकही आपापल्या प्रभागाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत. प्रभाग क्रमांक २५ मधील नगरसेवक योगेश गोतमारे, सौ. वैशाली शेळके यांनी स्वच्छतेसाठी असाच आगळा-वेगळा पुढाकार घेतला आहे.

दोन घटांगाडी सोबतच कचरा संकलनासाठी अॅपे वाहन सुरू केले आहे. प्रभागातील एका गल्लीत वाहन गेल्यावर वाहनावरील चालक अथवा सहकारी गल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर जाऊन ‘कचरा आहे का हो कचरा’, अशी आरोळी ठोकतो. आता या आरोळीची सवय नागरिकांना झाली आहे. त्यामुळे आरोळी कानी येताच, घरातील आबालवृद्धही डस्टबीन घेऊन घराच्या बाहेर येतात. या प्रयोगामुळे घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. या अॅपे वाहनासोबत कचरा संकलनासाठी दोन लोट गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत.

महिलांमध्ये जागृती करणार
प्रत्येकघरात निर्माण होणारा कचरा महिलांनी संकलित करावा, तो रस्त्यावर फेकू नये, यासाठी महिलांमध्ये जागृती केली जाईल. महिलांच्या विविध सणांच्या निमित्ताने कचरा घटागाडीचे महत्त्वही पटवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण महिला जागृत झाल्या, तर कुटुंब जागृत होईल. या अनुषंगानेच संपूर्ण प्रभाग कचरामुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'' वैशाली शेळके, नगरसेविका प्रभाग क्रमांक २५

ड्रमची व्यवस्था करणार
प्रभागातीलअपार्टमेन्टमधीर कचरा संकलित करण्यासाठी प्रत्येक अपार्टमेन्टला ड्रम देण्याची योजना आहे. त्याच बरोबर प्रभागातील मंदिरांमध्ये संकलित होणारे निर्माल्य संकलित करण्यासाठीही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. त्याच बरोबर कचरा संकलनासाठी प्रभागातील प्रत्येक गल्लीत घंटागाडी पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित केेले आहे.'' योगेशगोतमारे, सभागृह नेता तथा नगरसेवक

नि:शुल्क सेवा
कचरासंकलनासाठी सुरू केलेल्या या सेवेसाठी नागरिकांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळेच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आता प्रत्येक नागरिकाच्या घरी डस्टबीन पाहावयास मिळते आहे. डस्टबिनमध्ये दिवसभर निर्माण झालेला कचरा संकलित केला जातो.
बातम्या आणखी आहेत...