आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या साथीने उजळल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या वाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - समाजाचे काही देणे लागतो ही भावना, सामाजिक दायित्वाची जाणीव आजही समाजात जिवंत असल्याची बाब 'दिव्य मराठी'ने महापालिकेच्या शाळा क्रमांक २६ मधील पहिल्यांदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या महाअभियानातून सिद्ध झाली. या अभियानामुळे कवी गुरू ठाकूर यांच्या ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी’ या कवितेचा प्रत्यय या महाअभियानातून मिळाला. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन २६’ राबवण्यात आले. या मिशनअंतर्गत निवड झालेले सर्व विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले नाही, तर त्यांनी चांगले गुणही मिळवले आहेत. त्यामुळेच सामाजिक समस्या कोणतीही असो, मदतीचे हात एकत्र आल्यास केवळ समस्याच सुटत नाही तर पुढचा मार्गही सुकर होतो, ही बाबही सिद्ध झाली आहे.

महापालिका शाळांची केवळ दुरवस्थाच नव्हे, तर शैक्षणिक गुणवत्ताही ढासळली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य पालक या शाळांपासून दूर गेला आहे. परंतु, ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्या पालकांच्या पाल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु, असे असले तरी अद्यापही काही शाळा तग धरून आहेत. यापैकी एकच अकोल्यातील महापालिका शाळा क्रमांक २६ होय. नगरसेवक, शिक्षक, शिक्षिका आणि परिसरातील नागरिकांनी या शाळेला आपले मानल्यानेच ही शाळा खासगी शाळांनाही आदर्श ठरली आहे. या भागाचे ध्येयवेडे नगरसेवक दिलीप देशमुख यांच्या पुढाकाराने या शाळेत काही सुविधा उपलब्ध झाल्या तसेच दहावीच्या तुकडीलाही मंजुरी मिळाली. दहावीची पहिली बॅच दाखल झाली. परंतु, एकीकडे तज्ज्ञ शिक्षक नाही तर कोणतीही खासगी शिकवणी नाही. ही बाब लक्षात घेऊनच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "दिव्य मराठी'ने आक्टोबर २०१५ पासून हे महाअभियान राबवले. या महाअभियानाला प्रभात किड्स, मायबोली कोचिंग क्लासेस, श्री रेणुका माता मित्र मंडळ, रेडक्रॉस सोसायटी अकोलासह विविध सामाजिक मंडळांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने "मिशन २६'ने गती घेतली. केवळ १४७ दिवस हे मिशन राबवण्यात आले. आठवड्यातून एक दिवस मायबोली कोचिंग क्लासेसमध्ये तर मंगळवार आणि बुधवारी प्रभात किड्स येथे या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. यासाठी प्रभात किड्सने स्कूल बसची व्यवस्था केली.

अभिनंदनासह मदतीचा ओघ : 'दिव्य मराठी'ने राबवलेल्या या अभियानाबाबत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्याच बरोबर यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मदत देण्याचे आश्वासन अनेक सामाजिक संस्था, व्यक्तींकडून मिळाले आहे. तर प्रभात किड्सने शाळेतील पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीचा पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. तर मायबोली कोचिंग क्लासेसतर्फे तीन विद्यार्थ्यांसाठी अर्न अँड लर्न योजना राबवली जाणार आहे.

२२ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण
या अभियानात एकूण २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात १८ ते २० विद्यार्थ्यांनीच या मिशनमध्ये नियमित सहभाग घेतला. यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्या गावंडे या विद्यार्थिनीने ७८ टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे मिशन यशस्वी झाले.

सव्वा महिना होत्या मुक्कामी
शेवटची चाचणी घेऊन दहा मुलींची सव्वा महिना मायबोली कोचिंग क्लासेसच्या संचालिका सीमा बक्षी यांच्या निवासस्थानी निवास, चहा, नाष्टा, भोजन आदी सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या.

'मिशन २६'चे शिलेदार
प्रभातचे डॉ. गजानन नारे, मायबोलीच्या सीमा बक्षी यांच्यावर भिस्त होती. तर, या अभियानात कांचन पटोकार, प्रदीप अवचार, अजय फाले, प्राजक्ता जोशी, अभय कुटे, वृषाली वाघमारे, नीलेश पाकधुणे, श्रुती पांडे, अमित जोशी, माधव गावंडे, अजय खुळे यांनी काम पाहिले.

असे राबवले गेले मिशन
> दर महिन्याला झालेल्या अभ्यासक्रमावर एक परीक्षा
> चार चाचणी परीक्षा
> दोन सराव परीक्षा
बातम्या आणखी आहेत...