आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या समुद्र तटावरील मोडीत काढलेली जीवरक्षक बोट बनली पर्यटनाचे आकर्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोराडी जलाशयात जल पर्यटनासाठी उपलब्ध केेलेली बोट - Divya Marathi
कोराडी जलाशयात जल पर्यटनासाठी उपलब्ध केेलेली बोट
हिवरा आश्रम - गुजरातमधील आलंग समुद्र तटावर आशियातील सर्वात मोठ्या शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील जीवरक्षक बोट सद्या विवेकानंद आश्रम निर्मित विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जल पर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तर विवेकानंद आश्रम शुकदास महाराज यांची स्वप्नपूर्ती करणार आहे. 
 
गुजरातच्या समुद्र तटावर असलेले आलंग हे आशियातील मोडीत निघालेली जहाजे पुनर्वापरासाठी तयार करणे किंवा त्यातील लोखंड वेगळे काढण्याचे मोठे केंद्र आहे. या जहाजावर जीवरक्षक बोटी ठेवलेल्या असतात. त्यांचा आपत्कालीन परिस्थिती वगळता फारसा वापर होत नाही. त्यामुळे त्या अगदी सुस्थितीत असतात. विवेकानंद आश्रमाने नुकतीच अशीच एक बोट दीड लाखांपर्यंत विकत घेऊन ती कोराडी जलाशयात तैनात केली आहे. या जलाशयात विवेकानंद स्मारक मूर्त रूप घेत असून, त्याचे १० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. मानवहितकारी संत शुकदास महाराज यांचे विवेकानंद स्मारक निर्मितीचे स्वप्न होते. या स्मारकाच्या निर्मितीसाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ कामाला लागले असून, त्यासाठी किमान १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून हे स्मारक पूर्ण होणार असून सद्या त्याचे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या अस्तित्वाची जाणीव या स्मारकावर व्हावी, त्यांच्या वैचारिक, अध्यात्मिक सहवासाचा अनुभव व्हावा, यासाठी हे स्मारक आकर्षणस्थळ राहील, अशी अपेक्षा शुकदास महाराजांनी व्यक्त केली होती. त्याच्या पूर्ततेसाठी सद्या प्रयत्न सुरू आहेत. या स्मारकाच्या भेटीसाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या पर्यटकांना जल पर्यटनाचा आनंद या बोटीद्वारे मिळत आहे. मंगलधाम ते विवेकानंद स्मारक असा जलप्रवास या बोटीद्वारे सद्या पर्यटक स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून नागरिक येत आहेत. 
 
विवेकानंद स्मारकासाठी लागणार १५ कोटी 
कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर कोराडी जलाशयात विवेकानंद स्मारक असावे, अशी शुकदास महाराजांची इच्छा होती. तशा प्रकारचे डिझाईन स्वतःच महाराजांनी सुचवले होते. यानुसार सद्या काम सुरू आहे. पर्यटकांसाठी उत्तम निवास भोजन व्यवस्था, जल पर्यटन, स्मारकावर ध्यान मंडप स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्मिक, वैचारिक साहित्याची शोभिका, विविध अत्याधुनिक साधनांची उपलब्धता निर्माणाधीन आहे. या संपूर्ण स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 
बातम्या आणखी आहेत...