आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टर बंगल्यात शाही दिवाळी, मदतीचा दिला धनादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील कलेक्टर बंगला दिवाळीच्या निमित्ताने रोशणाईने आधीच उजळला होता. शनिवारपासून ही रोशणाई अधिकच वाढत होती. दोन दिवसांपासून बंगल्यातील वर्दळ आणि तयारीची धावपळ वाढली होती. निमित्त होते जिल्ह्याचा राजा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातील वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे.
सोमवारी रात्री तो धूमधडाक्यात साजरा झाला. बाहेरगावावरून आणलेल्या इव्हेंट कंपनीने या समारंभाचे चोख आणि भव्य आयोजन केले होते. सुमारे १५० वर हॅलोजन, लाइटच्या माळा, फुग्यांची आकर्षक सजावट, आणि शाही मेजवानी आज जिल्हाधिकारी बंगल्याने अनुभवली. धडक कारवाई करत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे टेक्नोसेव्ही कलेक्टर, अशी ओळख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरच्या या सोहळ्याचे साक्षीदार मात्र, आश्चर्यचकित होऊन केवळ सोहळ्याचे मूक साक्षीदार बनले होते.

अकोला जिल्हा सध्या नापिकी, दुष्काळी परिस्थिती कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडला आहे. शैक्षणिक सुविधांअभावी कालच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. जिल्हाधिकाऱ्यांपासून संपूर्ण महसूल विभाग या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनीच स्वत: गरजू आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पैसे नको, पण वस्तूरूपात मदत द्या, असे आवाहन केले आहे. नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करता खाऊच्या दहा हजारांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडेच जमा केली, अशाच पद्धतीने मदतीचा ओघ वाढत आहे. अनेक सामाजिक संघटनांसह दानशूर तसेच चतुर्थ तसेच तृतीय श्रेणी कर्मचारीही आपल्यापरीने मदत करत आहेत. खुद जिल्हाधिकाऱ्यांनीच या पुढाकाराचे कौतुकही केलेले आहे, अशा परिस्थितीत साजरी झालेली बंगल्यावरील दिवाळी मात्र अनेकांना खटकली. या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदआश्रम येथील मुलींना आमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा झाला.

शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. याची जाणीव असलेल्या सोनम श्रीकांत यांनी सानुग्रह मदत देण्याची इच्छा खुद्द जिल्हाधिकाऱ्यांजवळ व्यक्त केली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शेतकरी आत्महत्येची माहिती घेतली. तसेच शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करून सानुग्रह मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला.