आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना त्रास झाल्यास कुणाचीही गय करणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने पाण्याअभावी सुकत असलेल्या पिकांची अवस्था पाहून संयम सुटलेल्या दहीगाव अवताडे येथील जवळपास २०० शेतक-यांनी शनिवारी मनात्री खुर्द येथील वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही सबस्टेशन बंद पाडले. त्यानंतर अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मनात्री येथे पोहोचून शेतक-यांना त्रास दिला तर याद राखा, असा वीज वितरणच्या अधिका-यांना इशारा दिला.

मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बागायती शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. शेतामधील बोअरवेलला पाणी आहे. मात्र, वीज मिळत नाही. तीन तीन दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वीजपुरवठा सुरू झाला तरी केवळ दोन तासच राहत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. या संकटामुळे शेतक-यांच्या संयमाचा बांध फुटला. तालुक्यातील दहीगाव अवताडे, खापरखेड, मनात्री, आडसूळ, भांबेरी अटकळी येथील शेतक-यांनी वीज मिळत नसल्याने संतप्त होत आज मनात्री येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर मोर्चा वळवला.

जवळपास दोनशे ते अडीचशे शेतक-यांनी मनात्रीचे सबस्टेशन तासभर बंद पाडले होते. या घटनेची माहिती मिळताच आमदार भारसाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार यांना बोलावून घेतले शेतक-यांना त्रास होता कामा नये. शेतक-यांना त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असे म्हणत चांगलेच धारेवर धरले. आमदार भारसाकळेंसोबत भाजप तालुका सरचिटणीस एकनाथ ताथोड होते. या वेळी दहीगाव अवताडे, मनात्री, भांबेरी, आडसूळ, खापरखेड येथील शेतकरी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जानोरकर, उपकार्यकारी अभियंता सचनि कोहोड, सहायक अभियंता लोणकर, ठाणेदार अन्वर शेख उपस्थित होते.

खंडित वीजपुरवठा सुरळीत करा
वारंवारवीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतक-यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. अगोदरच वरुणराजाने दडी मारल्याने पिके सुकत आहेत. त्यातच वीजपुरवठाही सुरळीत राहत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्यास सिंचनाची समस्या सुटू शकते.'' महादेवथोरात, शेतकरी,मनात्री.

कृषिपंप कनेक्शन वेगळे करायला हवे
वीजपुरवठाकमी दाबाने मिळत असल्याने आडसूळ येथील सिंगल फेज डीपीवरील कृषिपंपाचे कनेक्शन वेगळे करण्याची वारंवार मागणी केली. मात्र, वीज वितरणकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. कृषिपंपाचे वीज कनेक्शन स्वतंत्र केल्यास वीजपुरवठा सुरळीत होईल.'' भास्करअरबट, शेतकरीआडसूळ

बोअरवेलला पाणी आहे, वीज नाही
शेतामध्ये बोअरवेल आहे. पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. मागील काही दिवसांपासून पाऊस झाला नसल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.'' दीपकडोंगरे, शेतकरी, दहीगाव अवताडे
आमदारांनी केली उपकेंद्राची पाहणी
आमदारप्रकाश भारसाकळे यांनी मनात्री येथील ३३ केव्ही उपकेंद्रात नव्याने बसवण्यात येणा-या ट्रान्सफार्मरच्या कामाची पाहणी केली. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचीही सूचना केली, जेणेकरून वीजपुरवठ्याबाबतची समस्या उद्भवणार नाही.