आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी रेकॉर्डनुसार महिन्याला हाेताे तीनशे लोकांना श्वानदंश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रात दर दिवशी साधारणपणे १० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. हा आकडा केवळ सरकारी असून तो सर्वोपचार रुग्णालयातील अाहे. तर खासगी हॉस्पीटलमध्ये कुत्रे चावल्यानंतर लस घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा आकडा त्यापेक्षाही दुप्पट आहे. पावसाळ्यात हिवाळ्यात कुत्र्यांचा प्रजोत्पादनाचा काळ असल्याने या महिन्यात चावा घेण्याच्या सर्वाधिक घटना घडतात, हे जरी खरे असले तरी तत्पूर्वीच अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तच प्रशासनाकडून होत नसल्याने कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत.

शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या जीवावर उठत आहे. मोकाट कुत्रे पिसाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुत्र्यांच्या दंशावर वेळीच उपचार आणि प्रतिबंधक लस घेतली नाही, तर मनुष्य पिसाळण्याची शक्यता अधिक असते. रस्त्यारस्त्यांवरील मोकाट कुत्रे पकडलेही जात नाहीत, तसेच त्यांची नसबंदीही केली जात नसल्याने त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचाच परिपाक म्हणून रस्त्यारस्त्यावर तसेच गल्लोगल्ली कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीच दिसून येतात. रात्रीच्यावेळी तर दुचाकी स्वारांच्या मागे ही कुत्रे लागत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असताना प्रशासन काही दिवस थातूरमातूर कारवाई करून मोकळे होते. मात्र त्यांचा त्रास पावसाळा आणि हिवाळ्यात नागरिकांना करावा लागतो. त्याचे कुणालाही देणे घेणे नसल्याचे सध्यस्थिती वरून दिसून येत आहे.

कुत्र्यांचा प्रतिबंध करावा : महापालिकाहद्दीमध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते. अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. कुत्रे पकडून ती शहराच्या बाहेर पकडण्याची मोहीम सध्या दिसून येत नाही. मात्र ही मोहीम इमानेइतबारे राबवण्याची गरज आहे, अशी मागणी सर्वसामान्य करीत आहेत.

रेबीजचा प्रसार कसा होतो? : रेबीजचेविषाणू हे पीडित कुत्र्याच्या लाळेत जागृत अवस्थेत असतात, तर निरोगी दिसणाऱ्या कुत्र्यात कधी कधी ते सुप्त अवस्थेत आढळतात. कुत्रा चावल्यानंतर रक्तस्राव झालेल्या अगदी छोट्याशा जखमेतून देखील हे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात मज्जासंस्थेवरच हल्ला करतात. प्रामुख्याने चावणे, चाटणे; तसेच दूषित पाण्याद्वारे रेबीजचा प्रसार होतो. या विषाणूचा मज्जासंस्थेत संपूर्ण प्रवेश झाला तर प्राण्यास किंवा माणसास मृत्यू अटळ असतो. त्यामुळे रेबीज रोगापासून कुत्र्याचे माणसाचे संरक्षण करणे क्रमप्राप्त ठरते.

श्वानांना रेबीजचे लसीकरण : लहानपिल्लांना रेबीज रोगाची लस साधारणतः तीन महिन्यांच्या वयात प्रथम टोचावी. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर बूस्टर डोस टोचावा. या तारखेपासून बरोबर वर्षाच्या अंतराने नियमित प्रतिवर्षी चुकता लसीकरण करावे. लसीकरणाच्या तीन ते पाच दिवस अगोदर, कुत्र्यास जंताचे औषध पाजावे. मोठ्या कुत्र्यास रेबीज रोगाचे लसीकरण पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार करावे.
पावसाळा, हिवाळ्यात सर्वाधिक श्वानदंश
पावसाळा आणि हिवाळा या कुत्र्यांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. या महिन्यात कुत्रे आक्रमक असतात. रस्त्यांवर त्यांच्या झुंडी दिसून येत असल्यामुळे अशावेळी ते माणसांवर अटॅक करतात. तर हिवाळ्यात कुत्र्यांच्या पिल्लांच्या जवळपास गेले तर कुत्री आक्रमक पवित्रा घेवून चावा घेण्याच्या घटना अधिक घडतात.

कुत्रा चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. सर्वोपचार रूग्णालयाच्या रेकॉर्डवर दरदिवशी साधारणपणे कुत्र्यांनी चावा घेतल्याचे १० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापेक्षा अधिक लाेक खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी जातात. मात्र खासगीत उपचार घेणाऱ्यांचा आकडा उपलब्ध नसल्यामुळे ३०० पेक्षा अधिक लोकांना कुत्रे चावण्याच्या घटना महिन्याला घडत आहेत.

कुत्रा चावल्यानंतर जखम ताबडतोब धुण्याचा सोडा, कार्बोलिक ऍसिड, साबण (लाईफबॉय), भांडी धुण्याची पावडर आदी अल्कलाईन द्रावणाने स्वच्छ धुवावी. प्रथमोपचारानंतर ताबडतोब लसीकरण करावे. लहान मुलांचा संपर्क मोकाट, तसेच पाळीव कुत्र्याशी होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही पाळीव कुत्र्यांना खरकटी भांडी चाटणे, चेहरा चाटणे आदी सवयींवर निर्बंध घालावा.
बातम्या आणखी आहेत...