आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसखाली येऊन चालकाचा मूर्तिजापूर स्थानकावर मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर बसस्थानकावर नागरिकांची गर्दी झाली हाेती.
मूर्तिजापूर- राज्य परिवहन महामंडळाच्या एका चालकाने बस भरधाव चालवल्याने एका बसचालकाचा मृत्यू झाला, तर एक युवक जखमी झाला. ही घटना सोमवार, १८ जानेवारी रोजी दुपारी येथील बसस्थानकावर घडली.

येथील बसस्थानकावर दुपारी १२ वाजतादरम्यान एका बाजूला मूर्तिजापूर आगाराची अकोला-यवतमाळ ही बस उभी होती. या वेळी डावीकडे दारव्हा आगाराची यवतमाळ-जळगाव ही बस उभी होती. या दोन्ही बसदरम्यानचे अंतर अत्यंत कमी होते. याच वेळी शेगाव आगाराची शेगाव-चंद्रपूर ही बस मागून भरधाव आली. या वेळी दारव्हा आगाराचे चालक अनिल काळे त्यांच्या बसकडे जात होते. मात्र, याच वेळी शेगाव आगाराच्या या बसने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी मूर्तिजापूर आगाराच्या बसच्या दारालाही धडक लागल्याने ते तुटून मोठा आवाज झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तिथे उभा असलेला अनिस शाह इब्राहिम शाह (वय २२, रा. जुनी वस्ती, बालाजी चौक, मूर्तिजापूर) हा युवकही अपघातात जखमी झाला. त्याला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान मृत्युमुखी पडलेले बसचालक अनिल काळे यांना वाहतूक शाखेचे पोलिस कान्स्टेबल राजू अहीर, मोईन खान, अशोक देशमुख यांनी रुग्णालयात नेले. घटनेनंतर धडक देणाऱ्या बसचा चालक विशाल गुलाबराव आत्राम (रा. पांढरकवडा) याने आपल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याचे कारण सांगितले. आगाराचे प्रभारी व्यवस्थापक, हेड मॅकेनिक अनिल मानके आणि चालक श्याम धर्ममाळी यांनी संबंधित बसच्या ब्रेकची तपासणी केली. त्या वेळी त्यांना ब्रेक निकामी नसल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर बसचालक आत्राम याने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन पडघन यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
याप्रकरणी मूर्तिजापूर आगारातील वाहक रिजवान युनूस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालक विशाल आत्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला.