आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हप्ता’ न दिल्यामुळे पोलिसांची मारहाण; चालकाने घेतले विष, दर्यापूर येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- काळीपिवळी चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या आमच्या भावाने दर्यापूर पोलिसांना ‘हप्ता’ दिला नाही, म्हणून पोलिसांनी त्याची गाडी ठाण्यात लावली. ती सोडविण्यासाठी पुरेसे पैसे घेऊन गेला नाही. त्यावेळी पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. आता पोलिसांना देण्यासाठी रक्कम नाही, रक्कम दिली नाही तर गाडी सुटणार नाही आणि गाडी सुटली नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल ? या विवंचनेत त्याने शुक्रवारी (दि. १९) विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप संतोष गंगाधरराव टोळे (२५, रा. दर्यापूर)या काळी पिवळी चालकाच्या दोन बहिणींनी केला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप दर्यापूर पोलिसांनी फेटाळले असून, या काळी पिवळी चालकाने गुरूवारी (दि. १८) मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे आम्ही त्याचे वाहन जप्त केल्याचे सांगितले आहे.
संतोष टोळे याच्याकडे काळी पिवळी वाहन असून, हेच वाहन चालवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. गुरूवारी दर्यापूरच्या पोलिसांनी संतोषला काळीपिवळीचा हप्ता मागितला. यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. कारण आठ दिवसांपूर्वीच संतोषच्या एक वर्षीय चिमुकलीची प्रकृती ठिक नसल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्याने पोलिसांना हप्ता नंतर देतो, असे सांगितले मात्र पोलिसांनी काहीही ऐकून घेता त्याचे वाहन थेट ठाण्यात आणले जप्त केले. तसेच ही रक्कम घेऊन ये आणि वाहन घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे संतोष शुक्रवारी ८०० रुपये घेऊन ठाण्यात गेला. मात्र पोलिसांनी यामध्ये आणखी रक्कम पाहिजे असे त्याला सांगितले. यापेक्षा जास्त रक्कम सद्या माझ्याकडे नाही,असे सांगितल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या शरीरावर व्रण उमटले आहे. पोलिसांना देण्यासाठी पैसे नाहीत, पोलिसांनी मागितले तेवढे पैसे नाही, अशावेळी कसे करायचे, याच विवंचनेत त्याने घराबाहेर जाऊन विष घेतले असा आरोप संतोष टोळे यांची बहीण सुनीता ईदोळ मंगला धांडे यांनी केला आहे. पोलिसांना हप्ता दिल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली आणि त्याने विष प्राशन केले असेही दोन्ही बहिणींनी सांगितले आहे.

संतोषने विष घेतल्यानंतर बहिणींनी तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले आहे. सद्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

प्रकरणाची माहिती घेतो
या प्रकरणाबाबत आपल्याला अद्याप (शुक्रवारी सायंकाळ) माहिती नाही. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतो. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर उचित कार्यवाही केली जाईल. एम.एम. मकानदार,प्रभारी पोलिस अधीक्षक

सर्व आरोप निराधार
गुरूवारी संतोषमद्य प्राशन करून काळी पिवळी चालवत होता. त्यामुळे त्याचे वाहन जप्त करून ठाण्यात आणले. तेव्हा त्याच्याकडे वाहनाचे कागदपत्र नव्हते. शुक्रवारी कागदपत्र घेऊन ठाण्यात बोलवले होते. मात्र तो आला नाही. त्याला पोलिसांनी हप्ता मागितला नाही किंवा मारहाणही केली नाही. कारवाईमुळे त्याने हे आरोप केले आहे. त्याने अन्य कारणासाठी विष घेतले असावे. नितीनगवारे, ठाणेदार, दर्यापूर.

संतोषविरुद्ध तांबा चोरीचा गुन्हा दाखल
काळीपिवळी चालक संतोष टोळेविरुद्ध यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे. तांबा तार चोरी प्रकरणात त्याचा सहभाग होता, अशी माहितीसुद्धा दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...