बुलडाणा : रस्ता सुरक्षा महत्त्वाची असून त्याकरता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन प्रांगणात २८ वे रस्ता सुरक्षा अभियान २०१७ चे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक श्वेता खेडेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहा परिवहन अधिकारी आर. बी. वाढोकार, पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षेबाबतची ही मोहीम शाळा, महाविद्यालये, कारखाने, विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन टाकसाळे यांनी केले.
याप्रसंगी तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा विषयक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन आभार प्रदर्शन प्रा. अनिल रिंढे यांनी केले.
अपघात कमी होण्यास मदत होईल
दरवर्षी नवीन वाहनांची संख्या दहा टक्क्यांनी वाढत आहे. वाहतूक नियमांचे पालन करून आपल्या जीवनाचे रक्षण करावे. कारण यामुळेच आपले आणि दुसऱ्यांचे जीवाचे रक्षण होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.