आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान, वाघा खु. परिसरात दुबार पेरणीस शेतकऱ्यांनी केला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- पावसाने तब्बल सव्वा महिना दडी मारल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने दुबार पेरणीस सुरुवात करावी लागली. महान परिसरातील वाघा खु., टिटवन, हलदोली, कोथळी, निंभारा, वस्तापूर, कासमार, झोडगा, खाेपडी, हातोला, साल्पी, सारकिन्ही, जांभरूणसह अन्य गावातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातील पावसाचा अंदाज घेऊन १० जूनपासून पेरणीस प्रारंभ केला होता. त्यानंतर १८ जूनपासून पावसाने दांडी मारली. त्यामुळे काही ठिकाणी बियाणे उगवले नाही, तर काही ठिकाणच्या शेतामधील अंकुर जाग्यावरच करपले. पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
पावसाअभावी कोवळ्या पिकांनी माना टाकल्यावर २२ जुलै रोजी पावसाचे आगमन झाले. मात्र, या कालावधीत पिके करपल्याने शेतकरी हतबल झाला होता. अखेर शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसा जुळवत पेरणीला प्रारंभ केला आहे. पावसाळ्याचे उरलेले दिवस लक्षात घेत शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी उडीद ज्वारी पेरण्यास पसंती दर्शवली आहे.
जून महिन्यात पेरणी केल्यावर शेतामधील उभी पिके नष्ट होऊन आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येईल, असा विचारही शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नव्हता. मात्र, वरुणराजाने दडी मारल्याने हे संकट ओढवले आहे. गेल्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा पेरणीचाही खर्च निघाला नव्हता. त्यानंतर यंदाही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन बार्शिटाकळी तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी महान परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.