आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणातील बदलांमुळे आरोग्याला धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, साथीच्या आजाराने डोके वर काढलेले आहे. प्रामुख्याने याचा फटका वयोवृद्धांसह बालकांना बसला आहे. त्यामुळे सरकारीसोबतच खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांपासून रुग्णांची गर्दी वाढली आहे. अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. विविध आजारांचे रुग्ण नोंदणीकरिता रांगा लावत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे होते. मात्र, शहरासह ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात सर्वात जास्त रुग्ण साथीच्या आजाराचे दिसून येत आहेत. यामध्ये खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, मेंदूचा हिवताप, उलट्या, नाक तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे, रक्तदाब कमी होणे, गालफुगी या आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये नालीतील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यापासून डेंगी ताप, मलेरिया, डायरिया, सर्दी, ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फीव्हर, डेंगी शॉक, सिंड्रोम या आजारांची लागण झालेली दिसून येते.

हे टाळा
1.उघड्यावरीलखाद्य पदार्थ खाणे टाळा
2.फ्रीजमधीलखाद्य पदार्थ खाऊ नका
3.हवेतप्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांना सायंकाळी बाहेर काढू नका.
फवारणीचाही विसर
सर्वत्र अस्वच्छता असल्यानंतरही प्रशासनाला धुर फवारणीचा विसर पडला आहे. मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात धूर फवारणी करणे गरजेचे झाले आहे.
ब्लिचिंग वापर नाही
ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
तापाकडे दुर्लक्ष करू नका
दोन दिवसांच्या तापाकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाने बालदमा, डेंग्यू, निमोनियाचा धोका वाढला आहे. मच्छरदाणीचा वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. डॉ.कमल किशोर ढोले, बालरोगतज्ज्ञ.