आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे संस्कृती नष्ट, ब्रह्मोत्सवात श्री विद्याभिनव शंकरभारती यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे संस्कृती नष्ट पावत आहे. अशावेळी आम्ही सतर्क झालाे नाही तर पुढचा काळ कठीण आहे, अशी जाणीव कडलीपीठ शृंगेरी गुरुपीठाचे शंकराचार्य श्री विद्याभिनव शंकरभारती यांनी ब्राह्मण समाजाला करुन दिली. भारत विद्यालयाजवळच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित ब्रह्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामिनी स्थितप्रज्ञानंद माताजी व्यासपीठावर होत्या. अध्यक्षस्थानी अ. भा. ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुळकर्णी होते. दायमा महाराज, आमदार गोवर्धन शर्मा, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उदय महा, नृसिंह भागवत, डॉ. हरिहर महाशब्दे, विष्णुदत्त शुक्ला, मोहन गद्रे, संजय शर्मा, नारायण देव, अमोल पाटील, नंदू सोपले, अंजली जोशी, नितीन रेलकर व्यासपीठावर होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोविंद कुळकर्णी, आमदार शर्मा, उदय महा यांनी आचार्यांचे आशीर्वाद घेतले. 

शंकराचार्य म्हणाले, ब्राह्मण समाजाला आपल्यातील शक्तीची आेळख करुन घ्यावी लागेल. आपण ऋषींचे वंशज आहोत ही जबाबदारी आेळखून आमचे समाजामध्ये वर्तन असले पाहिजे. आमच्या शरीरातील जिन्स पुण्यपुरुषांचे आहे याचे भान ठेवून आम्ही वागलो तर येणारी आव्हाने पेलू शकू. त्यासाठी एकजूट ठेवावी लागेल. गायत्री मंत्राचा जप, प्राणायाम, योग यांना जीवनामध्ये स्थान द्या, त्यातून उत्कर्ष शक्य आहे, असेही ते म्हणाले. 

स्वामिनी प्रज्ञानंद माताजी म्हणाल्या, विश्वात माणसाचे रक्षण होण्यासाठी धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्राह्मणत्वाचे रक्षण झाले पाहिजे. सध्याच्या स्थितीत ब्राह्मण शब्द उच्चारला की अनेक भेद डोळ्यासमोर येतात. परंतु गुह्य ज्ञान प्राप्त करण्याचे दायित्व नियंत्याने ब्राह्मण समाजावर टाकले आहे. शास्त्रकारांनी जे नियम, जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. त्याचे निर्वाहन योग्यरितीने करणे आवश्यक आहे. दैवीगुण, सदाचार, नितीमूल्य, उदात्त, आचार, विचार यांना जीवनात महत्व आहे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकात उदय महा यांनी, शाकंबरी पौर्णिमा, जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती असा सुवर्णयोग जुळून आल्याचे सांगितले. समाजाचे संघटन मजबूत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, बहुभाषिक ब्राह्मण समाज एकत्र येऊन त्यांच्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार झाले पाहिजे. अकोल्यामध्ये परशुराम जयंती उत्सव, समाज मेळाव्याची सुरुवात केली. त्याचा प्रसार झाला आहे. गदाधर शास्त्री यांनी १३ कोटी श्रीराम नाम जप यज्ञ यशस्वी केला. तर,नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांनंी विविध समाजातील नागरिकांना तीर्थयात्रा घडवल्याचा आवर्जून उल्लेख केला. 

गोविंद कुळकर्णी यांनी आपल्या भाषणणातून समाजाच्या ऐक्यावर भर दिला. हक्क आणि अधिकार प्राप्तीसाठी महासंघाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. संचालन आभार प्रदर्शन महेश मोडक यांनी केले.