आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने हजेरी लावावी, जगभर सुखसमृद्धी नांदावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील मुख्य ईदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा केली. त्यानंतर पावसासाठी अल्लाहकडे दुवा केली. जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावावी जगभरात सुखसमृद्धी नांदावी, म्हणून "विशेष दुआ' करण्यात आली. त्यानंतर एकमेकांची "गळाभेट' घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

गत महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातील ईदनिमित्त शहरातील हरिहरपेठ परिसरातील पुरातन ईदगाहवर नमाजसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जुने शहरातील या ईदगाहवर दरवर्षी बकरी ईद रमजान ईदची नमाज मोठ्या संख्येने अदा करण्यात येते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने परिसरात स्वच्छता करून चोख व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री चाँद दिसल्यानंतर आज सकाळपासून शहरात उत्साहाचे वातावरण होते. ईदगाह परिसर आबालवृद्धांनी फुलला होता. हजारो मुस्लिम समाजबांधव येथे जमले होते. बैद बिरादरीकडून दरवर्षीप्रमाणे काला चबुतरा, लाल बंगला येथून निशाण आणले. बैद बिरादरीचे शम्म तबरेज सिबसैन यांच्या नेतृत्वात शकुरखान लोधी, अय्युब रब्बानी, अश्फाक खान, हाजी इसराईल खान यांच्यासह संपूर्ण बैद बिरादरी सहभागी झाले. निशाण ईदगाहवर पोहोचल्यानंतर ईदची नमाज अदा करण्यात आली. इक्बाल हैदर मशिदीचे खतीब वा इमाम मुफ्ती गुलाम मुस्तफा साहब यांनी नमाज पढवली, तर शहर काझी काझीमोद्दीन यांनी खुतबा पढला. जुने शहरातील ईदगाहवर हजारोंच्या उपस्थितीत ठीक सव्वादहाला रमजान ईदची नमाज अदा झाली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पावसासाठी दुवा करण्यात आली. तसेच जगभरात शांती नांदून सुखसमृद्धी येवो, अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर काझी नाझीमोद्दीन यांनी लोकांना संदेश दिला. ईदची नमाज शांततेत शिस्तीत पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. शहरात पोलिस बंदोबस्त चोख होता. एसआरपीची एक तुकडी सुरक्षेसाठी होती.

सोशलमीडियावर शुभेच्छांचा वर्षाव :रमजान ईदनिमित्त आपल्या मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर झाला. सकाळपासूनच फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ईद मुबारकच्या आगळ्या-वेगळ्या संदेशांनी गर्दी केली होती.

मान्यवरांची हजेरी
रमजानईदची नमाज हरीहरपेठेतील ऐतिहासीक ईदगाहवर अदा करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह सर्व अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळींनी हजेरी लावली.

शिरखुर्म्याचा आस्वाद
रमजानईदच्या नमाजनंतर समाजबांधवांनी एकमेकास ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन ईदचा खास मेन्यू शिरखुर्म्याचाआस्वाद लुटला. हिंदू बांधवांनीही ईदच्या शुभेच्छा देत आपल्या मित्रांकडे शिरखुर्म्याचा आनंद लुटला.
बातम्या आणखी आहेत...