आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत अंकाचे गणित राष्ट्रवादी निश्चित करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीचे पडघम अद्याप वाजू लागले नसले तरी प्रभाग रचना जाहीर झाल्यावर निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. परंतु, आतापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भाजप-सेनेची युती होणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आघाडी हवी आहे. मागच्या निवडणुकीत २७ जागांवर तडजोड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या वेळी वाढली आहे. त्यामुळे आघाडी हवी असेल तर जागा वाटपाच्या अंकाची थेट बदल होण्याची शक्यता अाहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ४० पेक्षा अधिक जागांवर आपला हक्क दाखवणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे. तसाच राजकारणाचाही आहे. राजकारणात कोणत्याही एका पक्षाच्या मक्तेदारीचे दिवस आता संपले आहेत. अगदी स्थानिक पातळीवरही असे दिसत नाही. त्याच बरोबर एखाद्या नेत्याने पक्ष सोडला तर संबंधित पक्ष संपुष्टात येत नाही. मात्र काही प्रमाणात का होईना संबंधित पक्षाची ताकद कमी पडते. शहराच्या राजकारणात काही प्रमुख नेत्यांचा दबदबा आहे. त्यात विजय देशमुख हे नाव प्रामुख्याने येते. शिवसेना सोडल्या नंतर विजय देशमुख काँग्रेसमध्ये आले. परिणामी शिवसेनेची महापालिकेच्या राजकारणातील ताकद कमी झाली, तर काँँग्रेसची वाढली. आता विजय देशमुख राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही आहे. तर विजय देशमुख यांना माननारे त्यांचे समर्थक सर्वच पक्षात असले तरी काँग्रेसमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान तसेच इच्छुक विजय देशमुख यांच्याकडे वळण्याची अधिक शक्यता आहे. विशेष म्हणजे या अनुषंगानेही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

२०१२ च्या महापालिका निवडणुकीत ७३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादी कॉग्रेसला समाधान मानावे लागले होते. तर दोन जागा रिपाई गवई गटाला आणि काँग्रेसने ४४ जागा लढवल्या होत्या. काँग्रेसचे १८ तर राष्ट्रवादी काँग्रसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. परंतु, आता साडेचार वर्षांच्या काळात पुलाखालून बरेचपाणी वाहुन गेले. त्यावेळी कॉग्रेस मध्ये असणार आहे आणि स्वतच्या ताकदीवर सात ते आठ जागा निवडुन आणणारे विजय देशमुख राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आहेत. त्यामुळेच कॉग्रेसचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाटेवर आहेत. तुर्तास दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. यातून स्थानिक नेेतेही आघाडी होण्याच्या मुड मध्ये नाहीत. मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र आघाडी व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या दोन्ही पक्षात आघाडी झाल्यास जागा वाटपाचे अंक मात्र यावेळी वेगळे पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस ४० पेक्षा अधिक जागा मागण्याची शक्यता असून कॉग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महानगराध्यक्ष बदलाची शक्यता
महापालिका निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नव्या महानगराध्यक्षाचे नाव जाहीर होऊ शकते. जातीय समीकरणे लक्षात घेऊन हा बदल होण्याची अधिक शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...