आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी निवासस्थानालाही जेसीबीचा बसला दणका, मनपाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बिल्डर्सच्या अनधिकृत बांधकामावर चालणारा जेसीबी आता रहिवासी स्थानावरही चालत आहे. मंगळवारी रामनगर भागात एकाही बाजूने समास अंतर सोडणाऱ्या एका रहिवासी बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

बिल्डर्सच्या वतीने सुरू असलेल्या आणि अनधिकृत अथवा मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या इमारतींवर प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरू आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच या कारवाया झाल्या. परंतु, आता ज्या इमारतीत नागरिक वास्तव्यास आले आहेत, त्या इमारतीवरही कारवाईचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी केलेल्या तक्रारीतूनही अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. मंगळवारी रामनगर भागात झालेली कारवाईसुद्धा तक्रारीवरूनच झालेली आहे.

प्रतापराव उत्तमराव बोरसे यांचा मौजे उमरखेड भागात सर्व्हे नंबर ५-१५-१६, भूखंड क्रमांक १६ या मालकीची जागा आहे. या जागेत १८६ चौरस मीटर बांधकामाची परवानगी त्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाने दिली होती. परंतु, प्रत्यक्षात प्रतापराव बोरसे यांनी ३९३ चौरस मीटरचे बांधकाम केले. त्यामुळे २०७.१० चौरस मीटर बांधकाम मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त ठरले. इमारतीचा काही भाग दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यालगत असल्याने काही नागरिकांनी अवैध बांधकामाबाबत महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवरून महापालिका नगररचना विभागाने २०१३ पासून प्रतापराव बोरसे यांना नोटीस बाजवल्या. परंतु, या नोटीसकडे प्रतापराव बोरसे यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, आयुक्त अजय लहाने यांच्या आदेशान्वये या इमारतीवर कारवाई करण्यात आली.

समासअंतर सोडलेच नाही : नियमानुसारइमारतीच्या पूर्व आणि दक्षिण बाजूस दहा फूट, तर पश्चिम आणि उत्तर बाजूस पाच फूट समास अंतर सोडणे गरजेचे होते. परंतु, चार बाजूंपैकी एकाही बाजूने एक फूटही समास अंतर सोडण्यात आलेले नाही. त्यामुळेच प्रशासनाने या इमारतीवर कारवाईचा बडगा उगारला.

सर्वसामान्यनागरिकांमध्ये खळबळ : आतापर्यंतज्या इमारतीत नागरिक राहायला आलेले आहेत, त्या इमारतीवर कारवाई झालेली नाही. आता रहिवासी इमारतींवरही अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

५०हजार रुपये दंडात्मक कारवाई : दरम्यानप्रशासनाने अनधिकृत बांधकाम कारवाई प्रकरणी झालेल्या खर्चाबद्दल प्रतापराव बोरसे यांना ५० हजार रुपयाचा दंड आकारला. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेला दोन जेसीबी मशिन, जेसीबी चालक, कर्मचारी वर्ग कामाला लावावा लागला होता.
पुढाऱ्याची तक्रार?
प्रतापराव बोरसे यांच्या ‘स्वप्न’ या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. २०१३ पासून या तक्रारी केलेल्या होत्या. या तक्रारींमध्ये एक तक्रार राजकीय पुढाऱ्याची असल्याची चर्चा अनधिकृत बांधकाम मोहीम सुरू असताना घटनास्थळी सुरू होती.