अकोला - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने १२ जानेवारीला महात्मा फुले मुख्य भाजी बाजारात (जनता भाजी बाजार) अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. या मोहिमेबाबत कोणतीही पूर्व कल्पना दिल्याने मोहिम सुरु झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांची एकच धावपळ झाली. दरम्यान, काही राजकीय नेत्यांनी प्रशासनाला भाजी विक्रेत्यांना साहित्य काढण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. प्रशासनाने ही मागणी मान्य केल्याने ही मोहिम थांबण्यात आली.
मुख्य भाजी बाजारात दिलेल्या ओट्या शिवाय अनेक भाजी विक्रेते बाजारातील रस्त्यात ठाण मांडतात. त्यामुळे भाजी बाजारात एकच गर्दी होते. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच बरोबर खिसेकापूंसह समाजकंटक या संधीचा फायदा घेतात. ही बाब लक्षात घेऊनच अतिक्रमण विभागाने ही मोहिम राबवली. अतिक्रमण हटाव पथकाने भाजी बाजारातील मुख्य प्रवेशद्वारालगत पासून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हर्रासीच्या ठिकाणातील अतिक्रमण काढले. दरम्यान, कौलखेड चौकातील गजानन महाराज मंदिरा लगत असलेले अतिक्रमणही काढले. ही मोहिम क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी राजेंद्र घनबहादूर, सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, प्रविण मिश्रा, विजय बडोणे, शैलेश पवार, विनय पांडे, देवानंद मानकीकर, रामेश्वर खराटे, बाबाराव शिरसाट, विशाल शिरसाट, गणेश जंगम, विनोद वानखडे, रुपेश इंगळे, सय्यद रफिक आदींनी राबवली.
साहित्याचेे नुकसान, विक्रेत्यांची तारांबळ
कोणतीहीपूर्व कल्पना नसल्याने अकस्मात सुरु झालेल्या या मोहिमेमुळे भाजी विक्रेत्यांमध्ये एकच गडबड उडाली. तसेच काहींच्या साहित्याचेही नुकसान झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी घटनास्थळ गाठून विक्रेत्यांना साहित्य तसेच भाज्या, फळभाज्या काढण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. ही विनंती प्रशासनाने मान्य करुन तुर्तास मोहिम थांबवली.