आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everyone Should Be Ready To Prevent Pollution Of Water

जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने सज्ज असावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रत्येकाने पाण्याची बचत करण्यासोबतच जलप्रदूषण रोखण्यासाठी सज्ज असणे गरजेचे अाहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती ‘रन फॉर वॉटर’ या उपक्रमातून निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. जलजागृती सप्ताहांंतर्गत २० मार्च रोजी ‘रन फॉर वॉटर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी बाेलत हाेते.
राज्यात १६ ते २२ मार्चदरम्यान जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. रविवारी ‘रन फॉर वॉटर’चा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाला. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त अजय लहाने, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता विजय लोळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक शांताराम मालपुरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सहभाग घेतला.

रन फॉर वॉटरची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून होऊन अशोक वाटिका, नवीन बसस्थानक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, आकाशवाणी चौक नेहरू पार्क ते पुन्हा अशोक वाटिकामार्गे अधीक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे समारोप करण्यात आला.
या रन फाॅर वॉटरमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सहभागी होऊन रन फॉर वॉटर पूर्ण केली. यामुळे रन फॉर वॉटरमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. या वॉटर रनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक झळकत होते. ‘जल है, तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाणी वाचवा देश वाचवा’ यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

संपूर्ण शहर जलजागृतीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत होते. वॉटर रनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचारी यांनी जलजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट परिधान केले असल्यामुळे एक वेगळीच छटा रॅलीला दिसत होती. यामध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

"रन फॉर वॉटर' या उपक्रमाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत. या वेळी उपस्थित सीईअो एम. देवेंदर सिंह, आयुक्त अजय लहाने, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार.

"झेडपी'च्या कर्मचाऱ्यांचीही दांडी
रनफॉर वॉटर या प्रोग्राममध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. मात्र, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आढळून आली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत आयोजित कार्यक्रमात खुद्द कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार हेसुद्धा अनुपस्थित होते.

मनपाचे केवळ कर्मचारी उपस्थित
जलसप्ताह राबवण्याचे आदेश शासनाने दिले होते. या सप्ताहात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सहभागी होण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने पाणीसमस्येचा सामना करणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या वेळी अनुपस्थित राहिले. मनपाचे तर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंताही गैरहजर होते. स्वच्छता विभागाचे सात कर्मचारी आयुक्त असे कर्मचारी यात सहभागी झाले होते.