आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत परीक्षेपूर्वीच उत्तरे विद्यार्थ्यांजवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आधीच परीक्षेची उत्तरे सांगून शिक्षकांनी चाचण्यांची वाट लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कसा उच्च आहे, हे दर्शवण्यासाठी हा प्रकार विविध शाळांच्या व्यवस्थापनाकडून केला जात आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीतील प्रश्नांची लेखी उत्तरे देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे तात्पुरते हित साधले जात असले तरी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र परिणाम होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया कच्चा राहू नये यासाठी शासनाने त्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्याकरिता चाचण्यांचे नियोजन केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना गैरमार्गाचा अवलंब करण्यास शिकवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकच असे गैरप्रकार करीत असतील, तर शैक्षणिक दर्जा उंचावणार कसा? असाही प्रश्न निर्माण होतो. या चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुणांकन शासनाला आॅनलाइन कळवण्यात येणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी अभ्यासात मागे असतील, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे पायाभूत चाचण्यांना महत्व आहे. शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचण्या घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, त्यांचा शैक्षणिक दर्जा आदींचा आढावा घेण्याचा शासनाचा उद्देश आहे.
तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक अशा १९२ शाळा आहेत. या शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची सोय आणि त्यांच्या क्षमतेनुसार तणावरहित वातावरणात परीक्षा घेण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील विविध शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सर्वच ठिकाणी एकाच वेळी किंवा एकाच दिवशी ही चाचणी परीक्षा घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार विविध वेळेत परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी शासनाने पायाभूत चाचण्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रश्नांची उत्तरे जर विद्यार्थ्यांना आधीच सांगितली जात असतील तर ते चुकीचे आहे. हा प्रकार थांबवण्याच्या सूचना शाळांना शिक्षण विभागामार्फत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणारा शिक्षकांनी ज्ञानदानाच्या मूळ उद्देशाकडे डोळेझाक करुन मूळ उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रकार सध्या मालेगाव तालुक्यात सुरू आहे, असे प्रकार निदान शिक्षकांनी तरी करु नये, अशी अपेक्षा आहे.

परीक्षेचे स्वरूप : पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत. या परीक्षेचे स्वरूप नेहमीच्या परीक्षेपेक्षा वेगळे आहे.

प्रशासन करणार कारवाई
असा प्रकार शाळांमध्ये आढळून आला तर कारवाई करू. मात्र, ही परीक्षा झाल्याच्या १५ दिवसानंतर शासनाच्या वतीने अशासकीय संघटनेमार्फत पुन्हा एक परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेमध्ये मिळणाऱ्या अंकामध्ये फेरबदल आढळून आला तर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.'' रंगलालराठोड, गटशिक्षण अधिकारी, पं. स.मालेगाव