आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - तालुक्यातील मोरचंडी येथील पैनगंगा अभयारण्यालगत असलेल्या १२ गावांनी रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे १२ गावांतील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शनिवार, जानेवारी रोजी सलग चौथ्या दिवशी नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे. अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधींनी साधी भेटही दिल्यामुळे शासनाचा निषेध नोंदवत आज प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. 

शहरापासून ५० किलोमीटर दूर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही मूलभूत सुविधांची वानवा आहे. साधा रस्ताही नसल्याने ही गावे विकासापासून कोसोदूर आहेत. त्यामुळे शासनास वारंवार निवेदने आंदोलनांच्या माध्यमातून विनंती केल्यानंतरही पाझर फुटला नाही. त्यामुळे तालुक्यातील मोरचंडी, एकंबा, जेवली, सोनदाभी, परोटी गाडी, बोरी, थेरडी, बिटरगाव जवराळा, खरबी, दराटी, चिखली आदी गावांतील नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा पावित्रा स्वीकारला आहे. आज सलग चौथ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरूच होते. विशेष म्हणजे यातील गावांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तर मोरचंडी हे गाव भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतलेले गाव आहे. तरीही अभयारण्यातील ही गावे विकासापासून आजही कोसोदूर आहेत.
 
आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे निवेदनामार्फत विविध मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये मोरचंडी एकंबा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित दुरुस्त करणे, चिखली ते मोरचंडी रस्त्याचे काम सुरू करणे, बिटरगाव ते मोरचंडी ते जवराळा दराटी रस्ता दुरुस्त करणे, रोहयोअंतर्गत मजुरांना कामे देणे, जनावरांकरिता चराई क्षेत्र वाढवून देणे, वन हक्क मिळणे, या भागात कुठलेही संवाद माध्यम नसल्यामुळे संवादाची सुविधा उपलब्ध करून देणे, रस्त्यामुळे दळणवळण वाढून गावांचा विकास होतो. 
 
त्यामुळे ही गावे डांबरी रस्त्याने जोडून विकासाच्या प्रवाहात आणणे, अशा विविध मागण्या घेऊन अभयारण्यातील नागरिक उपोषणाला बसले आहेत. गाव विकास कृती समिती वन हक्क कृती समिती मोरचंडीचे अध्यक्ष जीवन फोपसे, हनवता आगोसे, सचिन जाधव, सयाबाई मेंडके, शशिकला भुरके, कमला बुरकुले, कौशल्या खोकले, सतीश इंगळे, भारत मेंडके, सुमन साखरे, शांता आमले, जिजाबाई ठाकरे, शाळुंका शिरडे आदी नागरिकांनी पैनगंगा अभयारण्यातील मोरचंडी रोडवर जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले. ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय असून, गरोदर महिलांचे बाळंतपण रस्त्यातच होत आहे. अनेक मातांचे जीव देखील यामुळे गेले आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याची शासन दरबारी नोंद आहे. तरीदेखील कुठलीच दखल घेत नसल्यामुळे नाईलाजास्तव बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. उपोषणाची दखल घेतल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. उपोषणकर्त्यांचीप्रकृती खालावली : चारदिवसांपासून १८ नागरिक उपोषणाला बसले होते. त्यापैकी जानेवारी रोजी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. या उपोषणकर्त्यांना उमरखेड येथील उत्तरवार शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे उपोषणाला बसलेल्या एकूण १८ उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एकही अधिकारी अद्याप फिरकला नाही. परिणामी, उपोषणकर्त्यांनी थेट बिटरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

आमदारांनीघेतले गाव दत्तक : सत्तेतयेताच भाजपने प्रत्येक खासदार आणि आमदारांना गाव दत्तक घेण्याचे सुचवले होते. या सूचनेनुसार उमरखेड-विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमरखेड तालुक्यातील मोरचंडी गाव दत्तक घेतले. त्यामुळे मोरचंडीसह आजूबाजूच्या गावाचा विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, दत्तक घेतलेल्या गावात विकास कामांना प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली नाही. 
 
समस्यांकडे दुर्लक्ष 
विकासकामे करावे,यासाठी परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, गावात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. आंदोलनाशिवाय पर्याय उरला नव्हता - जीवन फोपसे, अध्यक्ष, वन हक्क कृती समिती. 
बातम्या आणखी आहेत...