अकोला - उधारीचे ५००रुपये घेण्यासाठी पोलिस ठाण्यात मित्राविरोधातच चोरीची खोटी तक्रार दिल्याची घटना सोमवारी उघडकीस अाली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारदाराला समज देऊन सोडून दिले. जुने शहरातील एका मित्राने दुसऱ्या मित्राला ५०० रुपये उसणे दिले होते. त्याने त्यांच्या मित्राला पैसे परत करण्यासाठी एका दिवसाची मुदत दिली. पैसे परत केले नाही, तर पोलिसात तक्रार देऊन लॉकअपमध्ये टाकण्याची त्याने धमकी दिली होती.
मित्राने त्याचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. मात्र नशेखोर मित्राने त्याला दिलेल्या धमकीनुसार अखेर सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले अन् आपल्या हातातील अंगठी मित्रानेच चोरल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार घेतली आणि चौकशी सुरु केली. पोलिसांनी गैरअर्जदाराला ठाण्यात बोलावले. गैरअर्जदार ठाण्यात आला. ठाणेदार अन्वर शेख यांनी दोघांचीही कसून चौकशी केली. या चौकशीत गैरअर्जदार मित्राने पूर्वकथा पोलिसांना सांगितली, आम्ही तीघेही मित्र दारूचा घोट घेत असल्यामुळे चोरीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अखेर तक्रार खोटी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी सखोल चौकशी केली असता तक्रारदाराने तक्रार खोटी केली असून त्याने अंगठी सराफाकडे गहाण ठेवल्याची खात्री झाली.
खोट्या तक्रारी देण्याचे प्रमाण वाढले
दररोज देण्यात येणाऱ्या तक्रारीमध्ये खोट्या तक्रारींचे प्रमाण अधिक असते. त्यामुुळे तक्रार दाखल झाल्यानंतर तिची शहानिशा करणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे अनेकवेळा गुन्हा दाखल करण्यास उशिर होतो. मात्र चुकीने निरपराधावर कारवाई होऊ नये हाच उद्देश पोलिसांचा असतो- अन्वरएम. शेख ठाणेदार सिव्हिल लाईन्स पोलिस