आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीत शेतकऱ्याचा निर्घृण खून, वडील बेपत्ता झाल्याची मुलाने दिली होती तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. खून केल्यानंतर निर्दयतेने शेतकऱ्याचा मृतदेह पोत्यात बांधून घनदाट नाल्यात फेकून देण्यात आला होता. शेतकऱ्याच्या पाठीवर मानेवर कुऱ्हाडीचे घाव असल्याचे दिसून आले आहे. या घटनेला सावकारीची किनार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाथर्डी येथील शेतकरी रमेश उत्तमराव कुकडे (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. रमेश कुकडे हे १५ जूनपासून घरून बेपत्ता होते. शनिवारी गावातीलच पाथर्डीजवळील बायस्करी नाल्यातून दुर्गंधी येत असल्यामुळे मुलगा गोपाल कुकडे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना पोत्यात कुण्या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे आढळून आलेे. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या वेळी पोत्यात कुजलेल्या अवस्थेत रमेश कुकडे यांचा मृतदेह होता. रमेश कुकडे हे पाथर्डी येथील सधन शेतकरी असून, गावात त्यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी त्यांचे कुणाशीही वैर नसल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्या खुनाविषयी कुणीही संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान आहे. या प्रकरणी गोपाल कुकडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर करत असून, घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी भेट देऊन तपासासंबंधी तेल्हारा पोलिसांना दिशानिर्देश दिले आहेत. रमेश उत्तमराव कुकडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पाठीवर मानेवर कुऱ्हाडीचे घाव असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कुकडे यांचा खून कुऱ्हाडीच्या साहाय्याने केल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयतेने खून केला असून, त्यांचा मृतदेह कुणालाही शंका येऊ नये, म्हणून पोत्यात टाकून नाल्यात फेकला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी पोलिस करत आहेत.

रमेश कुकडे १५ जूनच्या रात्री घराबाहेर पडले तेव्हापासून ते बेपत्ता होते. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा गोपाल कुकडे यांनी गुरुवार, १६ जून रोजी तेल्हारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रमेश कुकडे यांच्या मोबाइलवर १५ जूनला रात्री कॉल आला होता. दरम्यान, शेतात जाणाऱ्या गावातील काही जणांना शनिवारी सकाळी तेल्हारा-अकोट मार्गालगत असलेल्या बायस्करी नाल्यात एका पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. गोपाल कुकडे घटनास्थळी गेले असता त्यांना वडिलांचा मृतदेह असल्याचे आढळले. कुकडे हत्याकांडामागे सावकारीची किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी दिली.

मृतदेह पाच तास घटनास्थळीच होता पडून
वैद्यकीय अधिकारी वेळेवर घटनास्थळी आल्याने तब्बल पाच तास मृतदेह उचलता तिथेच पडून राहिला. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळी उत्तरीय तपासणी व्हावी, अशी विनंती पाहता ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक तापडिया डॉ. अनिल मल यांच्याशी संपर्क करून केली. मात्र, दोन्ही डॉक्टरांनी घटनास्थळी जाण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे रमेश कुकडे यांचा मृतदेह उचलण्यास पाच तास प्रतीक्षा करावी लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
शेतकऱ्याचा कुजलेला मृतदेह बाहेर काढताना पोलिस कर्मचारी.