आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; वाशीम जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - ‘वैदर्भीय मुख्यमंत्री असूनही विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही’, अशी खंत पत्राद्वारे व्यक्त करत जऊळका (रेल्वे) येथील ३० वर्षीय व पदवीधर शेतकरी दत्तराव ऊर्फ गुड्डू आत्माराम लांडगे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी मित्र, आप्तेष्टांना आपण या जगातून निघून जात असल्याचा एसएमएसही पाठवला होता.
दत्तराव लांडगे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. उच्चशिक्षित असल्याने शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांचा चांगला अभ्यास होता. गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती परवडेनाशी झाली आहे, अशा व्यथा गावातील शेतकरी बोलून दाखवायचे तेव्हा दत्तराव त्यांना धीर द्यायचे. पीक पद्धतीबाबतही मार्गदर्शन करत. मात्र गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी काही मित्र, नातेवाईक यांना एसएमएस पाठवून या जगातून निघून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर लोकांनी दत्तराव यांचा शोध घेणे सुरू केले. मात्र काही वेळानंतर त्यांच्याच शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेतील दत्तराव यांचा मृतदेह दिसून आला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाची मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या वेळी मृत दत्तराव यांच्या खिशात मुख्यमंत्री, मित्र, काका, तीन वर्षांचा मुलगा, ठाणेदार यांना उद्देशून लिहिलेली पत्रे मिळाली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

शेतकऱ्यांना मदत नको वेतन द्या

मा. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री)
तुम्ही उच्चशिक्षित, विदर्भाचे नेते असल्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी सदैव होतो. तुम्हाला विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असायला हवी. पण तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करता. तुम्ही जर असेच राहिलात तर तरुण शेतकरी माझ्यासारखाच भ्याडपणाचा मार्ग अवलंबतील. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांसाठी या विषयात जातीने लक्ष घालायला हवे. त्यांना संकटातून वाचवायला हवे.
साहेब, मी हे मृत्युपत्र शेतात पाणी देताना लिहित आहे. तुमच्या लक्षात यायला हवे. विदर्भातील शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही. पण शेतीसाठी लागणाऱ्या गरजा, साधने, भांडवल यामुळे तो वैतागला आहे. जसे, माझ्या शेतात दोन वर्षांपासून पाइपलाइन केली. पण आजपर्यंत मी शेत भिजवू शकलो नाही. पाणी आहे, पण वीज नाही. पुरेसे भांडवल नाही. मात्र, या गोष्टीचा िवचार करायला कोणी तयार नाही.
साहेब, तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस पगार, भत्ते देता. उद्योगांना स्वत:हून मदत करता. मग तेच नियम शेतकऱ्यांसाठी का नाहीत. तुम्ही आणि मागील सरकारने शेतकऱ्यांना काय दिले. फक्त एक लाख रुपये. जो कर्मचाऱ्याचा एका महिन्याचा पगार तर व्यापाऱ्यांची एका दिवसाची कमाई असते. एक लाखात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाने कसे दिवस काढायचे. त्यासाठी तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किमान १० हजार रुपये मासिक वेतन द्यायला हवे.
साहेब, आजवर कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण त्यांनी काही बोलून दाखवले नाही. मी त्यांच्यासाठी व आत्महत्या करणाच्या मन:स्थितीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी न्यायाची मागणी करतोय, तेही आत्महत्या करून. जर माझ्या या लढ्याला न्याय मिळाला तर मी एक क्रांतिकारक आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून अमर होईल. आपल्या विदर्भातील एक तरुण क्रांतिकारी आत्महत्याग्रस्त शेतकरी.
- दत्ता आत्माराम लांडगे