आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदखेडच्या नाल्यावर होणार उगम ते संगम पद्धतीचे बांध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - पूर्ती उद्योग समूहाने स्वखर्चातून निर्माण केलेल्या वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा प्रकल्पापासून प्रेरणा घेत नांदखेड येथे त्याच धर्तीवर उगम ते संगम साखळी पद्धतीने नाला बांध तयार होत असून, पूर्वी बांधलेल्या १० बांधांचे खोलीकरण करण्यासाठी २७.६८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून पूर्ती उद्योग समूहाने काही वर्षांपूर्वी स्वखर्चाने वर्धा जिल्ह्यातील तामसवाडाच्या नाल्यावर उगम ते संगम साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधले. त्याचे यश पाहून त्याला तामसवाडा प्रकल्प संबोधण्यात आले. हे काम जनतेपर्यंत पाेहोचवण्यासाठी प्रकल्पाच्या व्हिडिओ सीडी तयार करून भाजपच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांमार्फत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यातून प्रेरणा घेत नांदखेड येथील तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. तालुका कृषी विभागामार्फत शिवारातील नाल्यावर साखळी पद्धतीने १५ बांध बांधले. त्यानंतर गत वर्षी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचे आणखी सहा काँक्रीट बंधारे मंजूर केले. जलसंपदा विभागाच्या देखरेखखाली हे काम प्रगतिपथावर आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांपैकी एका बंधाऱ्याचे लाख रुपये खर्च करून खोलीकरण केले. त्याचे चांगले परिणाम पाहता आणखीही बंधाऱ्यांचे खोलीकरण झाले पाहिजे, या उद्देशाने गावातील शेतकऱ्यांनी खासदार संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी असलेल्या १० बंधाऱ्यांच्या खोलीकरणासाठी २७.६८ लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. या कामांच्या माध्यमातून बंधाऱ्यांची क्षमता वाढणार असून, या परिसरातील शेतकऱ्यांना यामुळे शेतीच्या दृष्टीने अधिक लाभ मिळणार आहे.

सिंचनाच्या सुविधा हेच स्वप्न : तामसवाडीप्रकल्पाची व्हिडिओ सीडी पाहिली. जलपुरुष राजेंद्र सिंह यांचे विचार ऐकले. त्यानंतर लक्षात आले की, धावणारं पाणी वाहलं पाहिजे, वाहणारं पाणी थांबलं पाहिजे तसेच अशाप्रकारे थांबलेलं पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. पावसाच्या रूपात जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे. गावाला लागून वाहणारा नाला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो, हे समजले. मेहनत कष्ट करणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहणारे, शेतकऱ्यांच्या समस्या समजणारे खासदार संजय धोत्रे यांनी आमची तळमळ जाणली. त्यामुळे ही कामे मंजूर झाली. गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीला भरपूर पाणी असावे, सिंचनाच्या सुविधा असाव्यात, गाव सुखी समृद्ध व्हावे, हेच माझे स्वप्न आहे, असे मत भाजपचे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर इंगळे यांनी व्यक्त केेले.

ही कामे होण्यापूर्वी गावातील १० टक्के शेतीवर बागाईत होते. हे दुष्काळाचे वर्ष सोडले, तर ८० टक्के शेती हंगामी बागाईत झाली. त्यामध्ये शेतकरी दोन पिके कांदा, हरभरा, गहू घेतात, तर काही शेतकऱ्यांची शेती बारमाही बागाईत आहे. त्यामध्ये शेतकरी निंबू, मोसंबी, संत्रा, केळी यांसारखी पिके घेतात.

केलेल्या कामाचे चांगले परिणाम
खासदार संजय धोत्रे यांचे विशेष प्रयत्न
ही कामे होण्यासाठी गावातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत खासदार संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र देऊन प्रत्यक्षात बोलून कामाच्या सूचना दिल्या. बंधाऱ्याच्या खोलीकरणासाठी १६ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र दिले. परिणामस्वरूप १० बंधाऱ्यांच्या खोलीकरणासाठी २७.६८ लाख रुपये निधी मंजूर झाला.