आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागायतदार शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे वाढला कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन घटत आहे. हे चित्र पाहता जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले असून, एका वर्षात चार वेळा तुतीचे पीक घेऊन रेशीम शेती करणारे शेतकरी दुष्काळी परिस्थितीवर मात करत आहे. जिल्ह्यातील १२१ शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाकडे पहिल्या वर्षासाठी नोंदणी केली असून, या माध्यमातून १३० एकर जमीन तुतीच्या लागवडीखाली आली आहे.

किचकट आणि खर्चिक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. मात्र, जिद्द आणि चिकाटी असल्यास हा व्यवसाय मोठे आर्थिक उत्पन्न देणारा ठरतो. इतर पिकांच्या उत्पादनाच्या तुलनेत रेशीम उद्योग जास्त उत्पादन देणारा ठरत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील १२१ शेतकरी रेशीम शेती म्हणजे तुतीची लागवड करत असून, केवळ लोणार तालुक्यातील एकही शेतकरी यामध्ये समाविष्ट नसल्याची माहिती आहे. दरम्यान, असे असले तरी आगामी काळात लोणार तालुक्यातही रेशीम शेतीचा प्रचार प्रसार करून या परिसरात शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा रेशीम उद्योग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेशीमउत्पादनाचा कालावधी असा : नोंदणीकेलेल्या शेतकऱ्याला पहिल्या वर्षी एक एकर शेतीत जून ते जुलै या महिन्याच्या कालावधीत तुतीची लागवड करावी लागते. त्यानंतर एक ते वीस डिसेंबर या कालावधीत पहिले पीक येते. ५० अंडीपंुज संख्या असलेल्या रेशीम कीटक संगोपनातून या शेतकऱ्याला ४० किलोपर्यंत कोष प्राप्त होते. त्यानंतर ४० दिवसांच्या कालावधीनंतर दुसरे पीक घेताना १०० अंडीकोष प्लँटमध्ये टाकले जातात. या अंडीकोषाला तुती खाऊ घातल्यानंतर शेतकऱ्याला ८० किलो कोष प्राप्त होते. असेच सत्र सुरू राहिल्यास एक शेतकरी एका एकर तुती लागवडीवर ३०० अंडीकोषाचे संगोपन करून लाखोंचे उत्पादन मिळवतो.

तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
तालुका शेतकरी क्षेत्र
बुलडाणा १७ १९
चिखली १३ १३
मेहकर ०२ ०२
लोणार ०० ००
देऊळगावराजा ०१ ०१
सिंदखेडराजा ०७ ०९
मोताळा १६ १८
मलकापूर ०७
खामगाव २६ २९
जळगाव जामोद २५ २५
नांदुरा ०३ ०३
संग्रामपूर ०२ ०२
नांदुरा ०२ ०२

रेशीम पोहोचले रामनगरमला
जिल्ह्यातील१२ तालुक्यांमधील अनेक शेतकरी रेशीम शेती करत आहेत. रेशीम कीटक संगोपनातून मिळणारे रेशीम विक्रीसाठी जिल्ह्यासह अकोला, बीड, जालन्यासह राज्याबाहेर कर्नाटकमधील रामनगरम येथेही जाते. रेशीमला शासकीय दर १७५ प्रती किलो असून, खासगी स्वरुपात मात्र २०० ते ३५० रुपयांपर्यंत रेशीम विकले जात आहे.

अशी केली जाते शेतकऱ्याची निवड
रेशीमशेती उद्योग करणारा शेतकरी हा बगाईतदार असावा, किमान त्याची मालकीची एक एकर शेती असावी, बाराही महिने शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय असावी, अशा शेतकऱ्याच्या नावाची नोंदणी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात केली जाते.त्याला केंद्र राज्य शासनाकडून शेड उभारणी आणि तुती लागवडीसाठी आर्थिक मदत दिली जाते.

अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी
^इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेतीचे अधिक उत्पादन आहे. रेशीम अंडीकोषाला लागणारी तुतीवर कोणताही रोग येत नाही. तसेच हा व्यवसाय शेतकऱ्यांना लाभदायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही शेती केली पाहिजे. ए.व्ही. वराडे, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, बुलडाणा