आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, शेतकऱ्यांनी ठणकावले अन् केले अाश्वास्तही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे, असे ठणकावतांनाच प्रसंगी अाम्ही तुमच्या पाठिशी राहू, अशा शब्दात शेतकऱ्यांनी सेना नेत्यांना रविवारी  अाश्वास्त केले. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून रान पेटवले असून, यासाठी १४ मे राेजी  अकाेला जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवले. सेनेच्या लाेकप्रतिनिधींनी विधानसभासंघाचा दाैरा करुन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. मराठवाड्यातील शिवसंपर्क  अभियानाकडे सेनेच्या काही अामदारांनी पाठ फिरल्याने विदर्भातील अभियान यशस्वी हाेण्यासाठी पक्ष नेतृत्वाने काळजी घेतली हाेती.
 
शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेना केंद्र, राज्य सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाही. याच मुद्यावरुन शिवसेनेने राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. परिणामी सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले हाेते. त्यानंतर अाता  शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.  शिवसेनेचे आमदार बांधांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या अभियानामध्ये अामदार, ज्येष्ठ नेते, मुंबईचे नगरसेवक सहभागी झाले.  
 
काय म्हणाले शेतकरी ?
शिवसंपर्क अभियानअतंर्गत शिवसेना नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी अापल्या भावना व्यक्त केल्या. त्या अशा :
१) कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या इतरही मुद्यावर लढणाऱ्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या पाठिशी अाम्ही राहू, असे शेतकरी म्हणाले.
२)गतवर्षी समाधानकारक पिके झाली, उत्पादन वाढले; मात्र शेतमालाचे भाव पडल्याने नुकसान झाले. हमीभावानुसार शेतमाल खरेदी करण्यात अाला नाही. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळाले नाही.
३)राज्य सरकाराने अावाहन केल्याने तुरीचा पेरा केला. मात्र अाता तूर खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागत अाहे. तूर खरेदी केव्हा हाेईल अाणि पैसे केव्हा मिळतील, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले.
४) जागा असूनही घरकुलाचा लाभ मिळत नाही. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतरही याेजनांना लाभ मिळत नाही, असे शेतकरी म्हणाले.
५)सिंचन, भारनियमनाची समस्या दूर हाेईल, असे अाश्वासन निवडणुकीदरम्यान देण्यात अाले हाेते. मात्र या दाेन्ही समस्या दूर तर झाल्याच नाहीत, इतर अडचणींचा डाेंगर मात्र वाढतच अाहे, असा शब्दात शेतकऱ्यांनी भावनांना वाट माेकळी करुन दिली.
६) कॅशलेसचा सर्वाधिक फटका अाम्हाला बसला असून, दाेन हजारासाठी बँकेबाहेर दिवसभर ताटकळत उभे राहावे, लागते, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यापूर्वीचे सरकार काेणते वाईट हाेते, असा प्रश्नाच्या स्वरुपात एका शेतकऱ्याने अापली भावाना व्यक्त केली.

असा झाला मतदारसंघनिहाय दाैरा
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मराठावाडा, खान्देश, मुंबई येथील लाेकप्रतिनिधी व अकाेला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

१) अकाेट:- अामदार किशाेर पाटील व नगरसेवक रमाकांत रहाट,अामदार संजय गावंडे, दिलीप बाेचे व पदाधिकारी.
२) बाळापूर:- अामदार नागेश पाटील अाष्टीकर, नगरसेवक अनंत बिकुनत्र, संजय शेळके, रवींद्र पाेहरे हाेते.
३) अकाेला पश्चिम:- अामदार चंद्रकांत साेनवणे, नगरसेवक बाळकृष्ण रिप, राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, याेगेश गिते यांनी संवाद साधला.
४) अकाेला पूर्व:- राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अामदार बाळू धनाेरकर, शगुन नाटे, मुकेश मुरुमकार, विलास पाटील पागृत, सतिष मानकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
५) मूर्तीजापूर:- अामदार प्रल्हाद ठाेमरे, बंडू ढाेरे अप्पू तिडके यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

शिवसेनेत गटबाजीला उधान
गतवर्षी शिवसेनेच्या जिल्हा कार्यार्णीमध्ये माेठे फेरबदल्यानंतर गटबाजीला ऊत अाला अाहे. जिल्ह्यात शिवसेना ग्रामीण व महानगर अशा दाेन भागात विभागल्या गेली अाहे. काही दिवसांपूर्वी तूर खेरेदीवरुन शिवसेनेने तीव्र अांदाेलन केले हाेते. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास त्याच्या कार्यालयातून थेट तूर खरेदी केंद्रावर नेण्यात अाले. मात्र खरेदी केंद्रापर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच सेनेच्या दाेन नेत्यांनी अांदाेलनातून काढता पाय घेतला हाेता. तसेच अांदाेलनादरम्यान यावरुनही सेना नेत्यांमध्ये एकमत हाेत नव्हते.  निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेत नसल्याने अनेकदा महिला पदाधिकाऱ्यांमधूनही नाराजीचा सूर अावळण्यात येताे. त्यामुळे अाता शेतकऱ्यांच्या समस्या साेडवण्यासाेबतच शिवसेनेतील गटगबाजीचे अाव्हान पक्ष नेतृत्वापुढे उभे ठाकले अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...