आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या थांबवण्यासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढे यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. सरकारच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे सांगत आपल्या बापांच्या आत्महत्या थांबवणे गरजेचे असून, त्यासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी केले.
अकोला तालुक्यातील भौरद येथे युवा शेतकऱ्यांचा मेळावा २४ जानेवारी रोजी सायंकाळी वाजता आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. या वेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाकधणे, शहराध्यक्ष मनोज पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पुरस्कारप्राप्त विजय पाटील इंगळे, महानगराध्यक्ष स्वप्निल कुटाळे, जिल्हा संघटक श्याम पाटील, गोपाल गावंडे, खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबू, भौरदच्या सरपंच सविता डिघे, युवा विश्व रक्तदाता संघटनेचे अॅड. संतोष गावंडे यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी भाजप काँग्रेस सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत कडाडून टीका केली. काँग्रेसच्या काळात कापसाला भाव ४०५०, तर भाजपच्या काळात ४१०० रुपये भाव मिळत आहे. "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने केवळ ५० रुपये कापसाच्या भावात वाढ करून शेतकऱ्यांवर कोणते उपकार केले, याचा विचार करण्याची गरज आहे. अशा फसव्या सरकारला पाठीशी घालायचे की, हाती िवराेधाची मशाल घेत जाब विचारावा, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दर महिन्याला जिल्ह्यात सात ते आठ आत्महत्या होत आहेत. शासनाचे खायचे वेगळे अन् दाखवायचे वेगळे दात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाने डोळसपणे आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा अशा िवविध कारणांमुळे आत्महत्या होत असल्याचे दिसत असले तरी, खरे तर ह्या आत्महत्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त विजय इंगळे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मास्टर पॉवर जिमचे सदस्य प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

युवा मेळावे काळाची गरज
मनोजपाटील यांनी ज्याप्रमाणे भौरद येथे युवा मेळावे आयोजित केला. शेतकरी आत्महत्या या विषयावर चिंतन ठेवले. अशाच प्रकारे प्रत्येक गावात युवा शेतकरी मेळावे व्हावेत, अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट कार्याचा गौरव
महाराष्ट्र राज्य कृषी भूषण पुरस्कारप्राप्त विजय पाटील इंगळे यांचा प्रहार संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांनी सत्कार केला. याशिवाय मोरगाव भाकरे येथील अपंग शेतकरी अनंता वाघ, युवा कार्यकर्ता रोहित गावंडे याचाही सत्कार करण्यात आला.

भौरद येथे रविवारी आयोजित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित शहराध्यक्ष मनोज पाटील कार्यकर्ते.