आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खारपाणपट्ट्यात साेयाबीनच्या शेंगांचा चिपडा; उत्पादन घटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवरी - अकोट तालुक्यातील देवरीसह खारपाणपट्ट्यात यंदा साेयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र, सोयाबीनचा दाणा परिपक्व होण्यापूर्वीच शेंगा चिपडा होऊन वाळत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, शासनाने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आलेवाडी, देवरी, पाटसूल रेल्वे, पिंप्री डिक्कर या परिसरातील अस्मानी संकटासोबतच वन्यप्राण्यांच्या हैदाेसाचाही सामना करावा लागत आहे. नगदी पीक म्हणून येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दर्शवत या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सध्या सोयाबीनला शेंगाही चांगल्या आल्या. मात्र, या शेंगांमधील दाणा परिपक्व होण्यापूर्वीच शेंगा वाळत असून, शेंगांचा चिपडा झाला आहे. शेंगांमधील दाणा बारीक असल्याने सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर महिनाभर दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. सोयाबीनचे पीक चांगले असले, तरी अवेळीच शेंगा वाळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची पाण्याची सोय आहे, त्यांनी सोयाबीन पिकाला पाणीसुद्धा दिले आहे. वेळोवेळी फवारणीही केली. मात्र, शेंगांचा चिपडा होत असल्याने आता काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

रब्बी हंगामाची चिंता
पावसाने दडी मारल्यामुळे या वर्षी सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता मावळली आहे. दुबार पेरणीमुळे अगोदरच कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन कसे करावे याची चिंता लागली आहे. कपाशीवरही विविध रोगांचे आक्रमण होत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या संकटातून मार्ग काढण्यासाठी शासनाने अार्थिक मदत करावी, अशी अपेक्षा अकोट तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

सोयाबीनच्या शेंगा चिपडा होत असल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. कपाशीवर मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशीचे झाडे सुकत आहेत. दोन वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने अन्य पिकांच्या मशागतीसाठी कोठून पैसा आणावा याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शासनाने मदत करावी
यंदापावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सोयाबीनसह कपाशीचे पीकही संकटात सापडले आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे.'' सचिन गायकवाड, शेतकरी, देवरी.

सर्वेक्षण करून मदत द्यावी
^ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे शासनाने सर्वेक्षण करावे त्यांना मदत करावी. खारपाणपट्ट्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, हतबल शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.'' अशोकरावगायकवाड, शेतकरी, देवरी.
बोरगावमंजू | सोयाबीनवरअळी, तर कपाशीवर तुडतुड्यांचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्याअनुषंगाने मंडळ कृषी अधिकारी डी. एन. पवार, बोरगावमंजू येथील कृषी पर्यवेक्षक डी. एच. राखोंडे कृषी सहायक जी. के. दलाल यांनी गुरुवारी अन्वी मिर्झापूर येथील डाॅ. विजय वैराळे, संदीप लहाने यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली.

सोयाबीनवरील अळी कपाशीवर पडलेल्या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही समस्या असल्यास सांगाव्या त्या सोडवण्यात येतील. याप्रसंगी परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांनी पिकांसंदर्भात आपापल्या समस्या कथन केल्या. त्यावर मंडळ कृषी अधिकारी कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.