आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - वीज जोडणी अन्य समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला असून, वीज वितरण कंपनीच्या चकरा मारत आहे. मात्र, महावितरणकडे साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मूर्तिजापूर वीज वितरण कंपनीला लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अमित कावरे यांनी कार्यकारी अभियंता अकोला यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात डॉ. कावरे यांनी वीज वितरण कंपनीच्या साहित्य भांडाराची पाहणी केली. या वेळी विद्युत तार, ऑइल, किटकॅट, फ्यूज इतर साहित्य दिसल्याने संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. अनेक महिन्यांपासून वरिष्ठांकडे या साहित्याची मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप साहित्य मिळाले नसल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. साहित्याअभावी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे शक्य होत नसल्याचेही सांगितले. वर्ष २०१६ पर्यंत कृषी पंपांचे बॅकलॉग पूर्ण झाल्याची खोटी माहिती नियोजन समितीच्या बैठकीत अधिकारी देतात. मात्र, २०११ चीच कामे अजूनही झाली नाहीत. त्यामुळे या कामांची चौकशी करून बॅकलॉग भरून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. कावरे यांच्यासह राहुल पाटील, रामानंद फाटे, ज्ञानेश्वर मोटे, रणजित देशमुख, मोहनराव गावंडे, अॅड. फाटे, महेश पवित्रकार, गुणवंतराव जायले, साहेबराव जळमकर, संतोष धांडे यांनी केली.

महावितरणच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढत शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय करणार नसल्याचा इशारा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी येथे दिला. मनात्री, हिवरखेड अडगाव येथील शेतकऱ्यांना कमी दाबाने विद्युत मिळत असल्याने ते त्रस्त झाले अाहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

पालकमंत्री पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे यांनी महावितरणच्या सबस्टेशनला भेट देऊन सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना झापले. तालुक्यातील शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ वीज वितरणच्या कारभारामुळेच मनात्री सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली असून, शेतकरी हतबल झाला आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आठवडाभरापूर्वीच खापरखेड फाट्यावर शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले होते. तसेच पालकमंत्री आमदारांकडेही तक्रारी केल्या होत्या.
अखेर या तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्री पाटील आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शेतकऱ्यांसाेबत मनात्री सबस्टेशन गाठले त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची शाळा भरवली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच पालकमंत्र्यांसमोर वाचला. त्यानंतर यापुढे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. तसेच प्रलंबित जोडण्या तत्काळ देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी हिवरखेड, अडगाव नव्याने सुरू असलेल्या बेलखेड सबस्टेशनला भेट दिली. हिवरखेड येथील विद्युत उपकेंद्राला भेट दिली असता तेथील गलथान कारभार पाहून पालकमंत्री चांगलेच संतापले हाेते. या वेळी त्यांच्यासोबत महावितरणचे मुख्य अभियंता मेश्राम, कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार, तहसीलदार सचिन पाटील, तेल्हारा येथील वीज वितरणचे कोहळे तसेच विविध विभागांचे शाखा अभियंते उपस्थित होते.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कमी दाबाने मिळणाऱ्या विद्युत दाबामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळप्रसंगी आंदोलनेही केली. परंतु याचा काही फायदा झाला नाही. अखेर पालकमंत्र्यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांना सुनावले आहे.