आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या हाती यंदा ‘तुरी’ मिळण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खरिपात सोयाबीनने शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच दिल्यामुळे बहुतांश सोयाबीन उत्पादकांच्या आशा आता तुरीच्या पिकावर टिकून होत्या. परंतु सध्या तूर विविध बुरशीजन्य रोग अळ्यांच्या कचाट्यात सापडली आहे. चौदा हजारांवर गेलेली तूर तरी निदान शेतकऱ्यांच्या अंगणात ‘अच्छे दिन’ आणेल अशी आशा निर्माण झाली असताना सद्यस्थितीवरून तुरही शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी तुरीचे दर कमाल १४ हजार रुपयांवर गेले होते. परंतु शेतकऱ्यांची तुर बाजारात सरासरी सहा ते सात हजार रुपयांनेच विकली गेली होती. त्यामुळे वास्तवात या भावाचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा खरेदीदार व्यापाऱ्यांनाच बक्कळ झाला होता. परंतु सध्या तुरीचे दर साडे सहा हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तुरीचा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप दोन ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तुर सध्या फुलोरावर आहे.

हलक्या जमिनीतील तुरीने थंडी ओलाव्याअभावी आत्ताच माना टाकण्यास सुरवात केली आहे. भारी सिंचनाची सोय असलेल्या शेतातील तुरी सध्या जोमदार आहेत. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरींवर अळ्यांचा जोर वाढला आहे. तर भारी सिंचन केलेली तुर विविध बुरशीजन्य आजाराच्या कचाट्यात सापडली आहे. बुरशीजन्य रोगामुळे सिंचन केलेल्या तुरीचे पाने ऐन भरात पिवळी पडण्यास सुरवात झाली आहे. यासोबतच मर रोगाने तुरीची झाडे वाळून जात आहे. चांदुर बाजार तालुक्यात पिवळी पडणाऱ्या तुरीचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे.

माधान, ब्राह्मणवाडा थडी, सोनोरी, नानोरी शिवारातील तुर पिवळी पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वातावरणात कमालाची उष्णता असल्यामुळे रब्बी हंगामही फारसा समाधानकारक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या किमान आशा तुरीच्या पिकावर टिकून आहेत. परंतु तुरीवर सध्या झालेल्या विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे आलेले जोमदार पीकही दगा देते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आता मावळलेली दिसत आहे. आर्थिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

कोण काय म्हणते ?
तूर पिवळी
^तुरीवरयावर्षी प्रथमच पिवळ्या रंगाचे ठिपके पडून झाडांची पाने गळत आहे. अशा प्रकारचा रोग प्रथम दिसून आला आहे. दिलीप मोहोड, शेतकरी, माधान.

बुरशीजन्य आजार
^संबंधित रोगाची लागण बुरशीमुळे होऊ शकते. सिंचन केलेल्या तुरीवर याचा प्रादुर्भाव अधिक असतो. रोगग्रस्त तुरीची पाहणी करण्यासाठी त्वरीत शास्त्रज्ञ पाठविण्यात येईल. दत्तात्रयमुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

बीज प्रक्रिया आवश्यक
^बुरशीजन्य तूर वरचेवर उपटून जाळून टाकावी. अशा जागेवर दहा लीटर पाण्यात २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून द्रावणाचे ड्रिंचिंग फवारणी करावी.ओलावा असल्यास ट्रायकोडर्माचे ड्रिंचिंग करावे. प्रा.राजेंद्र जाणे, कृषी शास्त्रज्ञ.

तुरीवरील संकट गंभीर
तुरीचे पीक सध्या विविध रोगाला बळी पडले आहे. फुजेरियम उडम, फायटोप्थेरा ड्रेसलेरा, फायटोप्थेरा डिमेसिया या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगग्रस्त झाड उपटून खोड चिरून पाहिल्यास त्यावर तपकिरी रेषा दिसल्यास ती फुजेिरयम उडम ही मर रोगाची बुरशी अाहे असे समजावे. मारोती जातीच्या तुरीवर फायटोप्थेरा बुरशीमुळे खोडावर खड्डे गाठी आढळून येतात. पानावर पिवळे ठिपके किंवा पाने पिवळी पडून झाडे सुकण्याचे प्रमाणही अधिक आहे.

कोरडवाहू तुरीने टाकली मान
कोरडवाहू पट्ट्यातील हलक्या जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे तुरीचे पीक अडचणीत सापडले आहे. त्यातच थंडी नसल्यामुळे या भागातील तुरीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गत ‘तेलही गेले अन् तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशीच होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तुरीवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. एकमेव आशा असलेले तुरीचे पिक वाचविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पाच ते सहा हजार रुपये प्रति किलो दर असलेल्या महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत आहे. यासोबतच विविध सुक्ष्मखतांचाही वापर शेतकऱ्यांकडून केला जात आहे.