आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरखेड परिसरातही शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट / हिवरखेड - सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अकोट तालुक्यातील बागायती शेती क्षेत्रात शेकडो हेक्टरवर उन्हाळ्यात प्री-मान्सून कपाशीची लागवड करण्यात आली. सद्य:स्थितीत या जमिनीवर कपाशीच्या बोटभर आलेल्या रोपट्यांच्या कोवळ्या पानांवर अज्ञात कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हिवरखेड परिसरातील प्री-मान्सून कपाशीवरही हे संकट ओढवले आहे. पावसाला अद्यापही सुरुवात झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
तालुक्यातील बागायती क्षेत्रात दरवर्षी उन्हाळ्यात प्री-मान्सून कपाशीची लागवड करण्यात येते. मागील वर्षी या कपाशीचे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन झाले होते. इतर बागायती पिकांच्या तुलनेत प्री-मान्सून कपाशी उत्पादन देत असल्याने शेतकऱ्यांनी या वर्षी तालुक्यातील दोन हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. या वर्षी आधीच उन्हाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच भूजल पातळी खोल गेली होती. त्यातच आता शेतातील कूपनलिका विहिरी आटत आहेत. त्यामुळे प्री-मान्सून कपाशीला पाणी पुरत नसल्याने अनेक शेतकरी पाणी उपलब्ध असल्यास शेजारच्या शेतातील पाणी घेऊन कपाशीला देत आहेत. वाढत्या तापमानामुळे कपाशीची रोपटे कोमेजत आहेत. कपाशीची वाढ होत असतानाच कोवळी पाने करपण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे वन्यप्राणीही कपाशीची पाने खाऊन नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेतात राखण करत आहेत. वीज वितरण कंपनीद्वारे भारनियमन केले जात असून, अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकाला पाणी देण्यास अडचण येत आहे.

विविध समस्या भेडसावत असल्याने हे कापूस उत्पादक चिंताग्रस्त आहेत. काही दिवसांपासून आणखी एका समस्येची भर पडली आहे. केवळ बोटभर आलेल्या या कपाशीची कोवळी पाने अज्ञात कीटकांकडून कुरतडली जात आहेत. त्याचा परिणाम या रोपांच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे प्री-मान्सून कपाशीचे पीक घेणारे उत्पादक चौफेर संकटाच्या घेऱ्यात अडकले आहेत. मान्सून सक्रिय झाल्यानंतर या समस्यांमधून काहीअंशी दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
कपाशीवर अळ्यांचे आक्रमण नाही
^प्री-मान्सूनकपाशीवर अळ्यांचे आक्रमण झाले नाही. असे अनेक कापूस उत्पादक शेतकरी पिकावर अळ्यांचा हल्ला झाल्याचे सांगत आहेत. मात्र, कपाशीची पाने नाकतोड्यांकडून कुरतडली जात आहेत. यावर क्लोरोफाईफॉस या औषधीची फवारणी करावी.'' मंगेश ठाकरे, तालुकाकृषी अधिकारी, अकोट

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा अभाव
प्री-मान्सून कपाशीचे अकोट तालुक्यात अंदाजे दोन हजार हेक्टरवर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कपाशीची पाने कुरतडणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
बिकट समस्या| शेतकऱ्यांसमोरविविध समस्यांच्या मालिकेत पडली आणखी भर
हिवरखेड परिसरात प्री-मान्सून कपाशीची लागवड करून जेमतेम २० ते २२ दिवस झाली आहेत. शेतातील उपलब्ध पाणी कमी होत चालल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच काही शेतांमधील या कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव कोकळ्याचे(थीप्स) प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हिवरखेड लगतचा परिसर बागायती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली जाते. हा भाग कॉटनचा बेल्ट म्हणून ओळखल्या जातो. या भागातील बहुतांश शेतकरी हे १५ मेपासून कपाशी लावण्यास सुरुवात करतात. मात्र, ते वर्षांत कधी जास्त पाऊस, तर कोरडा दुष्काळ, यामुळे तापमान वाढले असून, पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी १५ मेऐवजी २० ते २५ मेपासून मान्सूनपूर्व कपाशी लावण्यास सुरुवात केली. कपाशी जगवत असताना सुरुवातीला वाणी ही कपाशीच्या रोपाचा शेंडा तोडून टाकते त्यामुळे कपाशीचे झाडच नष्ट होत आहे. त्यातच वीजभारनियमनाचीही समस्या, तसेच काही भागांत हरणांचा उपद्रव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सद्य:स्थितीत कपाशीचे रोपटे २० ते २५ दिवसांची झाली असतानाच आता तिच्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना या नव्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कपाशीवर सुरुवातीच्या २० ते २५ दिवसांत अळी कोकडा आल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाला लवकर सुरुवात व्हावी. त्यामुळे या समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...