बुलडाणा- शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊन स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, ६० वर्षांंवरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये सन्मान वेतन द्या, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, तर मलकापूर, धाड, शेगाव नांदुरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक महामार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. या वेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे.
टेंभुर्णाफाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
खामगाव- शेतकऱ्यांच्याविविध न्याय मागण्यांसाठी सोमवारी दुपारी साडे बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला खामगाव मार्गावरील टेंभुर्णा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहेत. यंदा निसर्गासोबत शासनानेही शेतकऱ्यांची हेळसांड चालवली आहे. शेत मालाला हमी भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी दिवसागणिक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू करण्यात येत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या मागण्या मान्य झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. रास्ता रोकोमुळे अकोला खामगाव महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प पडली होती. या आंदोलनात स्वाभिमानीचे पोफळे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, दामोदर इंगोले, राणा चंदन, श्याम अवथळे, मयूर बोंडे, महेंद्र जाधव, अमोल राऊत, प्रदीप शेळके, भारत वाघमारे, भगवान मोरे, संतोष मोरे, प्रशांत डिक्कर, गजानन बंगाळे यांच्यासह चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मोर्चा दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्याम घुगे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे, शहरचे ठाणेदार यु. के. जाधव, शिवाजी नगरचे संतोष टाले ग्रामीणचे ठाणेदार शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मलकापुरातप्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनविरोधी घोषणा
शेतकरीहिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजता येथील तहसील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभा प्रमुख संभाजी शिर्के यांनी केले. या आंदोलनात कार्यकर्त्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये फसव्या कर्ज माफी विरोधात एल्गार पुकारण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करून तहसील चौक परिसर दणाणून सोडला होता. या आंदाेलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष पंकज जंगले, शहराध्यक्ष रवींद्र कवळकर, मंगेश सातव, प्रांजली धोरण, नीलेश फिरके, अजय टप, शालीग्राम पाटील, शेषराव सोनोने, नरेश धोरण, अंकुश चौधरी, अर्जुन हिवाळे सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांनी शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.
धाड: शेतकऱ्यांनासरसकट कर्ज माफी देऊन स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने शहरातील शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते, अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांनी केले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी शासन विराेधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वैभव माहिते यांनी दिला. या आंदोलनात जीवन बांधे, सोमनाथ आदे, नीलेश गुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी धाड पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.
शेगाव: शेतकऱ्यांच्याविविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता येथील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून ताबडतोब ताब्यात घेतले. प्रहारचे प्रणेते आमदार बच्चू कडू यांच्या आदेशावरून हे आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने आज सकाळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक हातात घेऊन उड्डाण पुलावर आंदोलन केले.
या वेळी कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात शहराध्यक्ष नीलेश घोंगे, युवराज देशमुख, राजू मसने, मंगेश इंगळे, गजानन बिलेवार, दिलीप चिंचोळकार, मोहन देशमुख, संतोष कान्हेरकर, नितीन टवरे, तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, मुरलीधर काठोळे, गौरव काळे, संतोष राहुळकार आदींचा सहभाग होता. पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनात एपीआय भारती गुरनुले यांनी घटनास्थळावर चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.
नांदुरा|शेतकरी हिताच्या विविध मागण्यासाठी सोमवारी दुपारी वाजता प्रहार जनशक्ती शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील सुभाषचंद्र बोस चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या वेळी आंदोलकांनी शासनविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलांना स्थानबद्ध करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष रामेश्वर काटे, सुनील देशमुख, अजय घनोकार, राजेश घनोकार, संदीप गावंडे, शिवशंकर वक्ते, डॉ. नितीन नांदुरकर, विजय शिंगोटे, चोपडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.