आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल्हारा तालुक्यात पाच वर्षांत ११७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - निसर्गाच्यालहरीपणामुळे मागील काही वर्षांपासून सातत्याने होणारी नापिकी, घटलेले उत्पन्न वाढत असलेला कर्जाचा डोंगर यामुळे हतबल होऊन गत पाच वर्षांत तालुक्यातील ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये २३ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तालुक्यातील शेती सुपीक अाहे. निसर्गाने साथ दिल्यास भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता येथील शेतीमध्ये आहे. तालुक्यात एकूण ५८ हजार १०७ हेक्टर शेती असून, सात हजार ७६० हेक्टर शेती ओलिताखाली, तर उर्वरित ४४ हजार २५२ हेक्टर ७५ आर शेती कोरडवाहू आहे. सहा हजार ९४ हेक्टर शेती पेरणीयोग्य नाही. पाच एक्करपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ४९४ एवढी असून, त्यांच्याकडे ३१ जार ३४ हेक्टर, तर पाच एक्करपेक्षा जास्त शेती असलेले सहा हजार ३१२ शेतकरी आहेत. शेतीला पोषक वातावरण असले तरी तालुक्याचा बहुतांश भाग खारपाणपट्ट्यात येतो. यामध्ये भांबेरी, पाथर्डी, सिरसोली, मनब्दा, दापुरा, पंचगव्हाण, नेर, उमरी, पिवंदळ, आडसूळ, निंभोरा, मनात्री, तळेगाव डवला, तळेगाव पातुर्डा, वांगरगाव, उकळी, वरूड वडनेर आदी गावांचा समावेश आहे. बेलखेड, गोर्धा, तळेगाव बाजार, हिवरखेड, खंडाळा, चित्तलवाडी, चांगलवाडी, माळेगाव बाजार, सौंदळा, दानापूर, हिंगणी, कार्ला, वारखेड, अकोली रूपराव या गावांमध्ये सिंचनाची सुविधा असल्याने या भागातील शेती बागायती आहे.

खारपाणपट्ट्यातील शेती ही कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते, तर बागायतदारांकडे सिंचनाची सुविधा असूनही त्यांना विद्युत भारनियमनामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. शेतकरी सध्या जास्त उत्पन्न घेण्याच्या नादात तांत्रिक शेतीकडे वळला आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत शेतीच्या खर्चामध्ये कमालीची वाढ झाली. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतच आहे. त्यामुळे हतबल होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासनाकडून या आत्महत्या रोखण्यासाठी होणारे प्रयत्न तोकडे ठरत असल्याने पाच वर्षांत तालुक्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी ३९ शेतकरी शासकीय मदतीस पात्र ठरले आहेत.

मदतीस पात्र महिला शेतकरी
नावगाव आत्महत्या
दीपा भरत सपकाळ नेर १५/१०/२०१२
कुसुम उद्धव बिहाडे वरूड बु. २/११/२०१२
गंगाबाई आत्माराम गिल्ले निंभोरा खु. ७/१२/२०१३
कुसुम भीमराव गावंडे वरूड बु. १२/७/२०१४
आशाताई अशोक अढाऊ बेलखेड ६/१/२०१५
कांताबाई रामदास इंगळे बेलखेड २५/१२/२०१५
मनकर्णा भाऊराव पारधी वाडी अदमपूर २१/२/२०१५
मंगल वासुदेव लुटे पाथर्डी २१/८/२०१५