आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकीचे बळी: दोन मुली, एका मुलासह वडिलांची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभूळगाव (जि. यवतमाळ)- पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील कोरडवाहू शेतातील पिकांनी अक्षरश: माना टाकल्या आहेत. पदरचा पैसा खर्च करून बटईने केलेल्या शेतीतील सोयाबीनही वाळून गेले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या अार्थिक अडचणीत सापडलेल्या पित्याने अापल्या तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. बाभूळगाव तालुक्यातील फाळेगावात बुधवारी सकाळी साडेअाठच्या सुमारास ही घटना उघडकीस अाली. मृतात दाेन मुलींचा समावेश अाहे.

पांडुरंग श्रीराम कोडापे यांनी गावातीलच देवराव वानखडे यांची काेरडवाहू तीन एकर शेती बटईने घेतली हाेती. त्यात सोयाबीन, तूर या पिकांची लागवड केली. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे पीक वाळून गेले. त्यातच कुटुंबातील सदस्यांच्या सततच्या अाजारपणामुळे पांडुरंग यांना सतत अार्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. या चिंतेतून बुधवारी सकाळी त्यांनी अापल्या तीन लहान मुलांना कवेत घेऊन स्वप्निल दिवाकर बानुबाकोडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. सकाळी बानुबाकोडे शेतात गेले असता त्यांना विहिरीत एक मुलगी तरंगताना आढळली. त्यांनी तातडीने पाेलिस पाटील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. काही ग्रामस्थांनी विहिरीत उरतून शाेधाशाेध केली असता पांडुरंग कोडापे (४०), गायत्री (१३), कोमल (५) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश अाले. मात्र, दहावर्षीय जय याचा शाेध लागत नव्हता. त्यामुळे अधिक शाेधासाठी यवतमाळहून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बोलावण्यात आले. मोटर पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजता विहिरीच्या तळाशी माेटार पंपाच्या फुटबॉलजवळ जयचा मृतदेह सापडला. चारही मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांच्या मागे आई शांताबाई, पत्नी वंदना असा परिवार आहे.

जयचे प्रयत्न अपयशी
पांडुरंग कोडापे सकाळीच दोन मुलींसह मुलगा जय यांना घेऊन शेताकडे जाण्यासाठी निघाले हाेते. त्या वेळी जयने गावातच वडिलांच्या हाताला झटका देऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वडिलांनी त्याला पुन्हा पकडून सोबत नेले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

पत्नीने घेतले खासगी कर्ज
मृत पांडुरंग यांच्या पत्नी वंदना यांनी मायक्रो बचत गटाच्या खासगी कंपनीकडून काही कारणासाठी १५ हजार रुपये कर्ज उचलले होते. त्याचा हप्ता दरमहा २३०० रुपये हाेता. शेतमजुरी करून जीवन जगणाऱ्या कोडापे कुटुंबीयांना या हप्त्याच्या पैशांची तजवीज करणे अवघड जात होते. त्यामुळे पती-पत्नी दोघेही चिंतेत हाेते. त्यातून पांडुरंग यांनी हा टाेकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा गावात अाहे.
बातम्या आणखी आहेत...