आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्याचारपीडित ३९ महिलांना ‘महिला बालविकास’चे ‘मनोधैर्य’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अत्याचार पीडित महिलांना मदत म्हणून जिल्ह्यातील ३९ प्रकरणांमध्ये सुमारे ६० लाख रुपये वितरित केले जात आहेत. राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेंतर्गत ही रक्कम दिली जात असून, तशी कारवाई येथील महिला बालविकास अधिकारी कार्यालयात सुरु आहे. या योजनेसाठी गेल्या दोन वर्षांत ७३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये यापूर्वीच मदत देण्यात आली असून, उर्वरित ३९ महिला आणि बालकांना अर्थसहाय्य वितरित करणे सुरु आहे. अत्याचाराचे स्वरुप व्याप्ती या बाबीवरुन मदतीची रक्कम ठरवली जाते. सध्या वितरित केली जात असलेली एकूण रक्कम लक्षात घेता सरासरी प्रतिव्यक्ती दीड लाख रुपये दिले जात आहे.
मनोधैर्य योजनेच्या प्रस्तावांची मंजुरी आणि त्यासाठीची रक्कम जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच पार पडलेल्या बैठकीत अंतिम केली गेली. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा सरकारी वकील आणि एक अशासकीय सदस्य अशी ही समिती आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. याच समितीच्या बैठकीत मनोधैर्यचे प्रस्ताव निवडण्यात आले. शारीरिक शोषण, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला बालकांसह त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार मिळावा तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे. मनोधैर्य या नावातूनच या योजनेचे अंतर्बाह्य स्वरुप स्पष्ट होते. लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी ही योजना तयार केली. लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे अत्याचारग्रस्त मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. अशा मुलींना जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारची मनोधैर्य योजना उपयोगी आहे. या योजनेच्या माध्यमातून पीडित महिलांना पुनर्वसनासाठी आर्थिक आणि मानसिक आधार दिला जाणार आहे.

...तर त्या पोलिसांवरही कारवाई : महिलािकंवा बालकांचा छळ झाल्यास त्याबाबतचा विस्तृत अहवाल प्रथम खबरी अहवाल दाखल झाल्यानंतर लगेच जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांना कळवावा लागतो. परंतु या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांनी हयगय केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हािधकारी यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

७५ टक्के रक्कम मुदती ठेवीत : मनोधैर्ययोजनेंतर्गत अर्थसहाय्य मुदत ठेवी आणि रोख अशा स्वरुपात असते. मुळात या रकमेचा धनादेश लाभार्थ्याला दिला जातो. त्यातील ७५ टक्के रक्कम मुदतीठेवीत जमा होते. भविष्यात टप्प्याटप्प्याने ती उपयोगात यावी, अशी त्यामागची भूमिका आहे. उर्वरित २५ टक्केरक्कम संबंधिताच्या खात्यात जमा होते. त्यामुळे ती रोख स्वरुपात काढता येते.
बातम्या आणखी आहेत...