आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ११ कोटी ८४ लाखांच्या कामाची काढली वर्क ऑर्डर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पाडण्यास निमित्त ठरलेल्या ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर प्रशासनाने रात्री उशिरा जारी केली असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
२६ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्रासह पाणीपुरवठा विभागातील विविध दुरुस्ती करण्यासाठी ११ कोटी ८४ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले होते. सन २०१३ ला मिळालेल्या या निधीतून प्रत्यक्षात २०१५ च्या अखेरीस निविदा बोलावण्यात आल्या. एका कंपनीने १८ टक्के कमी दराने निविदा दाखल केल्या. परिणामी, या कंपनीस काम देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे पाठवला होता. या विषयावर महासभेत चर्चा झाली. परंतु, चर्चा पूर्ण होण्याआधीच महापौरांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. महापौरांच्या या निर्णयाबाबत सत्ताधारी गटानेच तीव्र नाराजी व्यक्त केली. ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून आयुक्तांना निवेदन दिले. एकतर फेर निविदा बोलवाव्यात अथवा पुन्हा सभेत या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी केली. याबाबत आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चर्चाही झाली. विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण यांनी या निविदांबाबत प्रशासनाने नेमका कोणता निर्णय घेतला, याची माहिती पत्रातून मागितली आहे.

दरम्यान, प्रशासनाने शुक्रवारी रात्री उशिरा कंत्राटदारास कामाचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होणार की गाडा सुरळीत चालणार? याबाबत महापालिकेत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.