आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येनगाव येथे आगीचे तांडव; 12 घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येनगाव येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेली घरे. - Divya Marathi
येनगाव येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेली घरे.
जळगाव जामोद- तालुक्यातील येनगाव येथे लागलेल्या भीषण आगीत बारा जणांचे घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत घरातील कपडे, भांडी इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना आज ११ एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने बारा कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. 
 
येनगाव येथील ज्ञानशिल दाभाडे यांच्या घराला अचानक आग लागली. हवेचा जोर अधिक असल्याने लाकुडफाट्याचे घर असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. एका एका घराला कचाट्यात घेण्यास सुरूवात केली. जवळपास बारा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अनेकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक घरातून आगीचे लोळ उठत असल्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. 
 
या दलाने पाण्याचा मारा करून दोन ते तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत घरातील कपडे, भांडे, अन्नधान्य इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत सर्वाधिक नुकसान ज्ञानशिल दाभाडे यांचे झाले आहे. मुलीच्या लग्नासाठी जमवलेले अांदणाचे साहित्य आजारी असलेल्या पत्नीची औषधी कागदपत्रेही या आगीत जळाली आहेत. तसेच या आगीत राजेश जवंजाळ, भगवान जवंजाळ, आनंदा वानखडे, प्रदीप वाघ, एकनाथ वानखेडे, रामहरी भारसाकळे, अरुण दाभाडे, शेषराव शिरसाट, मरी दाभाडे बाबुराव शिरसाट यांची घरी जळून खाक झाली आहेत. 
 
मंडळ अधिकारी एच.एन. उकर्डे, तलाठी एस.सी. श्रीनाथ, कोतवाल शिवहरी पुडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या आगीत नुकसान झालेल्या घर मालकांना शासनाच्या वतीने प्रत्येकी हजार ८०० रुपये सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...