अकोला : शहराच्या राजकारणात तूर्तास भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला आहे. या दोन्ही पक्षांना तुर्तास तरी चांगले दिवस असले तरी हे चांगले दिवस उमेदवारी देताना श्रेष्ठींसाठी डोकेदुखी आहे. भाजपमध्ये हिंदु बहुल भागात तर राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम बहुल भागात या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला २० पैकी पाच प्रभागात या डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एक तर काही इच्छुकांचे प्रभाग बदलले जातील अथवा काहींना थेट डच्चु मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात यश मिळाले नसली तरी महापालिका निवडणुकीचे चित्र मात्र वेगळे दिसणार आहे. काही प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि एमआयएम तर काही प्रभागात भाजप, शिवसेना आणि भारिप-बमसं अशा रंगती होऊ शकतात. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच विविध पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या उमेदवारी अर्जही भरुन घेतले आहेत. राष्ट्रवादीनेही उमेदवारी अर्ज घेतले.
मात्र राष्ट्रवादीच्या एका मोठ्या गटाने अद्यापही अर्ज दाखल केलेले नाहीत. त्या मागचे कारण म्हणजे काही प्रभागात झालेली उमेदवारांची भाऊगर्दी होय. त्यामुळेच राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित केले असून निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहिली.
राष्ट्रवादीला प्रभाग नऊ मध्ये उमेदवारी निश्चित करताना डोकेदुखी ठरणार आहे. विद्यमान नगरसेवक फजलु पहेलवान, अजय रामटेके हे राष्ट्रवादीचे आहेत.मात्र भारिप-बमसंच्या माजी महापौर ज्योत्स्ना गवई तसेच काँग्रेसच्या निकहत अफसर कुरेशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.त्याच सोबत माजी नगरसेवक मनोज गायकवाड, करीम खान, महंमद हैदर हे सुद्धा दावेदार आहेत.
तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये काँग्रेसच्या रिजवाना शेख अजीज, कोकीळा डाबेराव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.यांच्या सोबतच सुधीर काहकर, शेख अजीज ब्रोकर, अनिल मालगे हे दावेदार आहेत. प्रभाग क्रमांक १८ मध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिलीप देशमुख, जयश्री गेडाम हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच माजी नगरसेवक राजु रामभरोसे, शेख आसिफ, शेख अबरार, सरकटे यांच्यासह आणखी दोन जणांनी दावा केला आहे.
प्रभाग क्रमांक मध्येही माजी नगरसेवक अयुबलाला, अब्दुल मुनाफ, रहित पेंटर, मोबीन खान, जमिर खान, गुलाम पहेलवान, सरफराज खान अशा सात जणांनी दावा केला आहे. मध्यवस्तीतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये समाजवादीचे विद्यमान नगरसेवक नकीर खान केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले असले तरी या प्रभागतही चार जागांसाठी नकीर खान यांच्यासह जावेद झकेरीया, साबीर कुरेशी, बुढन गाडेकर, हाजी रियाज खान, डब्बुसेठ, आलीमभाई दुधवाले अशा सात जणांमध्ये चार जागांसाठी चुरस होत आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करणे पक्ष नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.