आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादातून नारायणपूरच्या शेकडो गावकऱ्यांना विषबाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा - विसर्जनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील निमगाव-नारायणपूर येथे आयोजित भंडाऱ्यात महाप्रसाद घेतल्यानंतर या गावातील शेकडो जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. या रुग्णांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गणेशोत्सवादरम्यान नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी महाप्रसादाचे दुपारी आयोजन केले होते. गावातील सुमारे ४००-५०० लोकांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सायंकाळी वाजेदरम्यान ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समाजसेवी संस्था, त्यांच्या रूग्णवाहिका, कार्यकर्ते यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेऊन मदत केली. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी संजीवनी देशमुख त्यांच्या सहकारी रूबिना पाटील, सौ. पाटील, सौ. बैरागी, सौ. के. बी. देशमुख कर्मचारी राजपूत यांनी तातडीने रूग्णांवर उपचार केले. तसेच परिस्थिती पाहता शहरातील डॉ. राजेंद्र गोठी, डॉ. नितीन नांदुरकर, डॉ. अनंत जैन, डॉ. मोहता, डॉ. प्रदीप हेलगे, डॉ. राखोंडे, डॉ.नदीम यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत रुग्णांवर तातडीने उपचार सुरु केले.

घटनेचे वृत्त कळताच आ. चैनसुख संचेती यांनीही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रूग्णांना धीर दिला. निमगाव येथील तसेच नांदुरा येथील रूग्णवाहिकांमधून तातडीने रूग्णांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले. रात्री कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, भारिपचे अशोकभाऊ सोनोने यांची रूणांची भेट घेतली. महाप्रसादातील गंगाफळाच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याची चर्चा परिसरात होती.
बातम्या आणखी आहेत...