आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० रुपयांसाठी पत्नीला जाळून मारले, ३४ टक्के भाजल्याने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पत्नीला१०० रुपये दारू पिण्यासाठी मागितले. तिने ५० रुपये दिले. त्यावरून दोघांत वाद झाला. वादाचे पर्यवसान पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्यात झाले. ३४ टक्के भाजलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शिवणी येथे बुधवारी रात्री घडली.
सहिदाबी मो. जाकीर वय ४० ,असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मो. जाकीर मो. बशीर हा त्याच्या पत्नीसह शिवणी येथे राहतो. या दाम्पत्याला चार मुले आहेत. दोन मुलींचे लग्न झाले आहेत, तर दोन मुले या दाम्पत्याकडे राहत नाहीत. मो. जाकीर मो. बशीर याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो पत्नी सहिदाबीसोबत नेहमी भांडण करत असतो. त्याच्या भांडणाला कंटाळून त्याचा मुलगा आणि मुलगी हे त्याच्या भावाकडेच शिवणीमध्येच राहतात. बुधवारी मो. बशीर याने त्याच्या पत्नीला दारू पिण्यासाठी १०० रुपये मागितले. मात्र, दररोज कुठून दारू प्यायला पैसे द्यायचे म्हणून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर सहिदाबी यांनी त्याला १०० रुपयांऐवजी ५० रुपये दारू पिण्यासाठी दिले. त्या पन्नास रुपयांनी मो. बशीर याचे समाधान झाले नव्हते.
दारू पिऊन आल्यानंतर पुन्हा त्याने पत्नीसोबत वाद घातला तिला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकले आणि तिला माचिसची काडी लावून पेटवून दिले आणि तो लगेच घरून बेपत्ता झाला. गंभीर भाजलेल्या सहिदाबी यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मो. बशीर याला गुरुवारी दुपारी वाजता अटक केली.

तहसीलदारांची टाळाटाळ : जळालेल्यामहिलेचे बयाण नायब तहसीलदारांनी घ्यावे, अशी पद्धत आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यास पोलिस लगेच नायब तहसीलदार यांना घटनेची माहिती देतात. त्यानंतर नायब तहसीलदार भाजलेल्या महिलेचे बयाण घेतात. हे बयाण महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरल्या जातो. बुधवारी रात्री सहिदाबी भाजल्यानंतर त्यांचे बयाण घेण्यासाठी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी नायब तहसीलदार यांना बोलावले. मात्र, आता नाही मी सकाळी येतो, असे म्हणून तहसीलदारांनी बयाण घेतले नाही. परिणामी, सकाळी महिलेचा मृत्यू झाला.