आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे उड्डाणपूल; फेर निविदांची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेगाव मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवणाऱ्या डाबकी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामातील विघ्ने अद्यापही दूर झाली नाहीत. लातूर येथील कंपनीला पुलाचे कंत्राट दिल्यानंतर निविदा भरणाऱ्या नांदेड येथील एका कंपनीने न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. या प्रकरणात तूर्तास स्थगनादेश मिळाला असला, तरी पुलाच्या कामाच्या फेर निविदा बोलावल्या जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
अकोला ते शेगाव (उरळ मार्गे) या मार्गावरून तेल्हारा, जळगाव जामोद आदी गावांना जाता येते. अकोल्यावरून खामगाव मार्गेही शेगावला जाता येत असले तरी हा मार्ग लांब पल्ल्याचा आहे. त्यामुळे शेगावला उरळमार्गे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. तसेच याच मार्गावरून निमकर्दामार्गे हजारो भाविक शेगावची पायदळ वारी करतात. परंतु, याच मार्गावरून मुंबई-कोलकाता हा रेल्वे मार्ग गेला आहे. या मार्गावर डाबकी गावाजवळ रेल्वेगेट आहे.
रेल्वेच्या प्रवासी तसेच मालवाहू वाहने वाढल्याने सतत रेल्वेगेट बंद करावे लागते. त्यामुळे वाहतूक खोळंबते. त्यातच गायगाव येथे तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो असल्याने दररोज हजारो टँकरचे येणे-जाणे सुरू असते. तसेच गांधीग्रामच्या पुलावरून पाणी वाहू लागले की, हा मार्ग बंद होतो. या मार्गावरील वाहतूक शेगावमार्गे वळवली जाते. त्यामुळेच डाबकी रेल्वे गेटवर उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. खासदार संजय धोत्रे यांनी ही मागणी लक्षात घेऊन पुढाकार घेतला आणि केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत रेल्वे उड्डाणपुलासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे उड्डाणपूल; फेर निविदांची शक्यता उर्वरित सोपस्कार पूर्ण केले. निविदा प्रसिद्ध केल्या. जानेवारी महिन्यात या निविदा उघडण्यात आल्या. लातूर येथील एका कंपनीला या रेल्वे उड्डाणपुलाचे काम देण्यात आले. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असतानाच नांदेड येथील निविदा दाखल करणाऱ्या एका कंपनीने ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, त्या कंपनीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनी पुलाचे काम करण्यास सक्षम नसल्याचे नमूद करून या कामासाठी पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे. तूर्तास न्यायालयाने स्थगनादेश दिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला २० मार्चच्या आत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागणार आहे. उड्डाणपुलाचे काम न्यायालयात गेल्याने आता या पुलाचे काम रखडणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी फेर निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

उड्डाणपूल महत्त्वाचा
या मार्गावर सतत जड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जड वाहनाखाली येऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

मार्ग काढण्याचे प्रयत्न
हा गुंता सोडवण्याचा आमचा विभाग प्रयत्न करत आहे. २० मार्चपूर्वी प्रतिज्ञापत्रही सादर केले जाणार आहे. तक्रारदार कंपनीने फेर निविदेस कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने बहुधा कमी कालावधीच्या फेर निविदा बोलावल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. - व्ही. एम. भाले, अधीक्षक अभियंता, सा. बां. विभाग
बातम्या आणखी आहेत...