आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका प्रभागामधून आता चार नगरसेवकांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या२०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. या निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असून, दोन महिला दोन पुरुष, असे सूत्र आखले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुढील निवडणूक वॉर्ड की प्रभाग? पद्धतीने ही उत्सुकता निकाली लागली आहे.
सन २००१ ला महापालिका अस्तित्वात आली.
महापालिकेची सन २००२ ला पहिली निवडणूक झाली. अकोला महापालिकेसोबत राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुकाही पार पडल्या. या निवडणुकीत वॉर्डऐवजी प्रभाग पद्धतीचा अवलंब झाला. या निवडणुकीत एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले गेले, तर त्यानंतर २००७ ला झालेल्या निवडणुकीत वॉर्ड पद्धतीचा वापर करण्यात आला. सन २०१२ ला झालेल्या निवडणुकीत पुन्हा प्रभाग पद्धतीचा वापर झाला. या निवडणुकीत एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडल्या गेले. त्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग की वॉर्ड? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. आपापल्या परीने तर्क-वितर्क लढवले जात होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कोल्हापूर, औरंगाबाद तसेच डोंबिवली या महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड पद्धतीचा वापर करण्यात आला. परिणामी, सन २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही वॉर्ड पद्धतीचा वापर होईल, अशी अपेक्षा विद्यमान नगरसेवकांनी व्यक्त केली होती. परंतु, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिला दोन पुरुष, असे प्रभागाचे स्वरूप राहणार आहे. त्यामुळे अपक्षांसह लहान-सहान पक्षांच्या उमेदवारांना विजयासाठी ताकद लावावी लागणार आहे. परंतु, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार या पद्धतीचा फायदा मोठ्या पक्षांना मिळू शकतो.
मोठ्या राजकीय पक्षांना मिळू शकतो फायदा
या आधी प्रभाग वॉर्ड पद्धतीचा वापर झाला आहे. प्रभाग पद्धतीत मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना फायदा झाला होता, तर वॉर्ड पद्धतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची ताकद कमी होऊन, अपक्षांचे तसेच लहान-सहान पक्षांची ताकद वाढली होती. त्यामुळे आता पुन्हा प्रभाग पद्धतीचा वापर होत असल्याने एकदा मोठ्या राजकीय पक्षांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकाप्रभागात पाच नगरसेवक निवडले जातील : अकोलामहापालिकेत नगरसेवकांची संख्या ७३ आहे. त्यामुळे प्रभागांची संख्या ३६ वरून १८ होईल. परंतु, नगरसेवकांची संख्या विषम असल्याने एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जातील. या प्रभागाचे स्वरूप तीन महिला दोन पुरुष, अशी राहण्याची शक्यता आहे.

एका प्रभागातून तीन नगरसेवक आणि चार नगरसेवक, असे दोन प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. तीन नगरसेवकांचा निर्णय झाल्यास दोन महिला, एक पुरुष ५० टक्के प्रभागात दोन पुरुष, एक महिला, असे सूत्र वापरल्या जाऊ शकते. परंतु, एका प्रभागातून चार सदस्य निवडीचा निर्णय होण्याची अधिक शक्यता आहे. याविषयी हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. सुनील मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक.