आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात सोमवारपासून तीन दिवसीय ग्रंथोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाचन चळवळ वाढावी, या हेतूने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रमिलाताई ओक सभागृहात १५, १६ आणि १७ फेब्रुवारी अशा तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथपाल सोपान सातभाई यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात १२ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी उपस्थित होते. सोमवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने या ग्रंथोत्सवास प्रारंभ होणार आहे. या ग्रंथदिंडीत माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर, महादेवराव भुईभार, डॉ. आर. बी. हेडा, मनमोहन तापडिया, डॉ. गजानन नारे, डॉ. सुभाष भडांगे सहभागी होणार आहेत. दहा वाजता डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील राहणार आहे. महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘सोशल मीडिया वाचन संस्कृतीला पोषक?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी शरद पाटील राहणार असून, डॉ. गजानन नारे, "दिव्य मराठी'चे कार्यकारी संपादक सचिन काटे, ज्येष्ठ पत्रकार रवी टाले सहभागी होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. अध्यक्षस्थानी पत्रकार सुहास कुळकर्णी राहणार असून, यात सीमा शेटे-रोठे, डॉ. किरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे सहभागी होत आहेत. तीन वाजता होणाऱ्या कविसंमेलनात किशोर बळी, रवींद्र महल्ले, अरविंद भोंडे, प्रा. विठ्ठल कुलट, सुरेश पाचकवडे, राजेश डांगटे, डॉ. रामप्रकाश वर्मा, डॉ. विनय दांदळे सहभागी होणार आहेत. चार वाजता अभिवाचन होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे राहणार आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता "वाचन संस्कृती-ग्रंथोत्सव' या विषयावर चर्चासत्र होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर. बाहेती राहणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, सतीश फडके, स्वप्ना साकरकर, स्वाती दामोदरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सवादरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत पुस्तक प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. या ग्रंथोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सोपान सातभाई आणि युवराज पाटील यांनी केले.

बुधवारी होणार समारोप
ग्रंथोत्सवाचा समारोप बुधवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील राहणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, आयुक्त अजय लहाने, संतोष सोनी, ज्ञानेश्वर आंबेकर, मीनाक्षी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.