आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funeral Become Eco Friendly, First Experiment In Nagpur

सुखद साेमवार: अंत्यसंस्कार आता पर्यावरणपूरक, नागपूर येथे पहिला प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शासनासह पर्यावरणवादी पुढाकार घेत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड वाचवण्यासाठी शवदाहिनीचा प्रयोग मोठ्या शहरांमध्ये सुरू झाला आहे. परंतु, मध्यम शहरांमध्ये अद्यापही लाकडेच वापरली जातात. परंतु, आता पर्यावरणप्रेमी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढे सरसावले आहेत. अंत्यसंस्कारासाठी व्हाइट कोल (गट्टू) चा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.विशेष म्हणजे नागपूर येथे नुकताच एक अंत्यसंस्कार व्हाइट कोलच्या माध्यमातून करण्यात आला. अकोला शहराच्या सातही स्मशानभूमीत प्रत्येकी एक टन व्हाइट कोल उपलब्ध होत आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. यातून सर्वसामान्य माणूसही सुटलेला नाही. हजारो वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच विज्ञानवाद्यांनी शवदाहिनीसाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, शवदाहिनीची व्यवस्था सर्वच गावांना किंवा सर्वच स्थानिक संस्थांना खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. नागपूर येथील विजय लिमये एक वर्षापासून गवऱ्या दहन प्रकार सुरू केला. या एक वर्षाच्या काळात १३५ दहन गवऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. एका माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी सात मन लाकूड नष्ट होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाचवण्यासाठी त्यांनी गवरी दहनाच्या प्रकाराचा प्रसार प्रचार सुरू केला. यातून त्यांची भेट अकोला येथील पर्यावरणप्रेमी उदय वझे, देवेंद्र तेलकर यांच्याशी झाली आणि मग शेणाची एकूण कमतरता लक्षात घेऊन गवऱ्यांसोबत व्हाइट कोल (गट्टू)चा उपयोगही करता येणे शक्य आहे, ही बाब समोर आली. ‘अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक’चा प्रचार आणि प्रसार सृष्टी वैभव या संस्थेने सुरू केला आहे, तर रोटरी क्लब ऑफ अकोला, अक्षरा वाचन संस्कार, आपला प्रयास, सृष्टी वैभव, आयएमए वॉकथॉन, युथ होस्टेल असोसिएशन अकोला, रोटरॅक्ट क्लब या संस्थाही सहभागी झाल्या आहेत.
चळवळ राबवण्याचा प्रयत्न
अंत्यसंस्कारासाठी १५ वर्षांच्या झाडाचा बळी घेणे पर्यावरणासाठी योग्य नाही. तसेच लाकडातील कार्बन डायॉक्साइड अर्धवट जळाल्यास वातावरणात घातक वायू पसरतात. याऐवजी व्हाइट कोलचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे संवर्धन होईल. त्यामुळे नेत्रदान, देहदानाच्या धर्तीवर अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक ही चळवळ राबवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आमचे प्रयत्नही सुरू आहेत.
उदय वझे, पर्यावरण प्रेमी
स्मशानभूमीत व्यवस्था
व्हाइट कोलचा वापर पर्यावरणासाठी पूरक आहे. त्यामुळेच शहरातील सातही स्मशानभूमीत व्हाइट कोलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी व्हाइट कोलचा वापर करावा. अजय लहाने, आयुक्त अकोला
झाडासोबत पैशाचीही बचत
एकाव्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे सात मन लाकडाची गरज भासते. यासाठी १५ वर्षांच्या झाडाचा बळी द्यावा लागतो, तर २१०० ते २५०० रुपये खर्च करावे लागतात. परंतु, व्हॉइट कोलचा वापर केल्यास केवळ १००० रुपये खर्च येतो. त्यामुळे झाडासोबत पैशाचीही बचत शक्य आहे.