आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गजानन अवलिया अवतरले जग ताराया!’ श्रींच्या पालखी सोहळ्याने शहरात पसरले चैतन्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - संत गजानन महाराज पालखीचे हे यंदाचे ४९ वे वर्षे आहे. शेगाव येथून ११ जून रोजी निघालेल्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. श्रींच्या स्वागतासाठी डाबकी रोडवासीयांनी जय्यत तयारी केली. ठिकठिकाणी आकर्षक देखावे साकारले. श्रींच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता. रस्त्यांवर सडा शिंपडून सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. महिला-युवतींनी रस्त्यांच्या कडेला, मध्ये आकर्षक भव्य रांगोळ्या काढून श्रींचे भक्तिभावाने स्वागत केले. ठिकठिकाणी आरतीचे तबक सजले होते. कुठे पुष्पांची उधळण करून, तर कुठे फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींचे जल्लोषात स्वागत झाले. सर्वत्र श्रींचे दर्शन घेण्यासाठी उभे असलेल्या भक्तांची गर्दी दिसत होती. श्रींच्या रजत मुखवट्यावर पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालखीच्या अग्रभागी अश्व, बँड पथक, ध्वजधारी, त्या मागे भजनी मंडळ, टाळ-मृदंगाच्या गजरात गजाननाच्या जयघोषात पावल्या खेळणारे वारकरी, त्यानंतर फुलांनी सजवलेली श्रींची पालखी हे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य होते.

स्वागतास हजारो क्विंटल धान्याची मदत : श्रींच्यापालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी फराळ, शरबत देण्याची प्रथा बंद झाली असली, तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. रस्त्याच्या कडेने श्रींची प्रतिमा, मूर्ती यांची आकर्षक सजावट करून भजनांच्या सुरात स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी भजने सादर केली. भक्तिसंगीत, भजनांच्या सुरात पालखीचे स्वागत झाले. श्रींचे पूजन, स्वागतासह अनेक ठिकाणी लोकांनी धान्याच्या रूपात साहाय्य केले. काही किलोपासून तर अनेक क्विंटलपर्यंत धान्य देण्यात आले. शिवपान मंदिर मित्र मंडळाने अडीच क्विंटल गहू दिले, तर दुसरीकडे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्षभर जमा केलेल्या खाऊच्या पैशातून ६० किलो गहू दिले. सातवी ते दहावीत शिकणाऱ्या जवळपास १२ विद्यार्थ्यांनी यंदादेखील हा उपक्रम राबवला. गीताई एकता मंडळातील ही चिमुकली मुले मागील वर्षांपासून सेवा देत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी लोकांनी धान्याच्या रूपात साहाय्य केले.

खंडेलवाल शाळेत महाप्रसाद : डाबकीरोडमार्गे पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आली. या वर्षी दर्शनाची व्यवस्था महाविद्यालयातून बाजूच्या पटांगणात करण्यात आल्याने भक्तांना शांतपणे दर्शन घेता आले. येथे भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था होती, तर मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयात वारकऱ्यांच्या भोजनाची चहाची व्यवस्था होती. या वेळी स्वागत सोहळ्याच्या व्यासपीठावर गोपाल महाराज राऊत, दिवाणजी हिंगणेकर महाराज, स्वागत समितीचे अध्यक्ष शिवलाल बोर्डे, ज्येष्ठ मार्गदर्शक देवलाल अग्रवाल गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे गोपाल खंडेलवाल, खेळकर महाराज उपस्थित होते. श्रींच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलनाने स्वागत समारोहाला प्रारंभ झाला. या वेळी अग्रवाल गुरुजी, शिवलाल बोर्डे, गोपाल खंडेलवाल यांनी ही सेवा अविरत घडावी, असा मानस व्यक्त केला, तर गोपाल महाराज राऊत यांनी मनोभावे केलेली सेवा, भक्तांची श्रद्धांच साक्षात्कार घडवत असल्याचे सांगितले.
शेगाव येथून ११ जूनला निघालेली श्रींची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १३ जुलै रोजी पोहोचणार आहे. श्रींच्या पालखीचा पंढरपूर येथे चतुर्दशीपर्यंत मुक्काम असतो पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुक्कामी श्री संस्थानच्या वतीने दशमी, एकादशी द्वादशीला जवळपास लाख वारकरी भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येतो. संस्थेच्या नियमांप्रमाणे १० टाळजोड, वीणा, मृदंग, हातोडी हे भजनी साहित्य तर श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथ भागवत श्री तुकाराम गाथा हे संत साहित्य दिल्या जाते. आतापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतातील ६४ जिल्ह्यांमध्ये १६,१८५ गावांना भजनी साहित्य वितरित केले आहे.

श्रींची पालखी १३ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार असून, चतुर्दशीपर्यंत मुक्काम असणार आहे. गुरुपौर्णिमेला पालखी शेगावसाठी प्रस्थान करणार आहे. करकंबस कुर्मदास, कुर्डुवाडी, रिधोरा, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, मानकेश्वर, भूम, कुंथलगिरी, चौसाळा, उदंडवडगाव, पाली, बीड, पेंडगाव, गेवराई, शहागड, शहापूर, पारनेर, लालवाडी, धनगर पिंप्री, जालना, न्हावा, सिंदखेडराजा, किनगाव राजा, बिबी, किनगावजट्टू, लोणार, सुलतानपूर, मेहकर, नायगाव दत्तापूर, जानेफळ, वरवंड, शिर्ला नेमाने, विहिगाव, आवार, खामगावमार्गे शेगावला पोहोचेल.
पालखीचा प्रवास श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातूर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबापेन, म्हसलापेन, किनखेड, रिसोड, पानकन्हेरगाव, सेनगाव, श्रीक्षेत्र नरसी, दिग्रस, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जवळा बाजार, अडगाव रंजोबा-हट्टा, श्रीक्षेत्र त्रिधारा, परभणी, ब्राम्हणगाव, दैठणा, खळी, गंगाखेड, वडगाव, परळी, परळी वैजनाथ, कऱ्हेरवाडी, उपळा, उस्मानाबाद, सिद्धेश्वर, श्रीक्षेत्र तुळजापूर, सांगवी, उळे, सोलापूर, तिऱ्हे, कामती, माचपूर, ब्रह्मपुरी, श्रीक्षेत्र मंगळवेढा श्रीक्षेत्र पंढरपूर असा राहील.

बातम्या आणखी आहेत...